Shivsena: "हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 03:33 PM2022-10-10T15:33:21+5:302022-10-10T15:35:10+5:30

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे

"It was because of his opposition to Hanuman Chalisa that Lord Rama snatched his bow and arrow from shivsena.", MLA Ravi Rana on uddhav Thackeray | Shivsena: "हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले"

Shivsena: "हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी धनुष्यबाण हिसकावले"

Next

मुंबई - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यासाठी शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असताना निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना धक्का देत पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेना हे नाव आता दोन्ही गटांना वापरता येणार नाही. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेच्या इतिहासातील या आजवरच्या सर्वात मोठ्या घडामोडींमुळे शिवसेनेवर मोठं संकट उभारलं आहे. या संकटात भाजपसह इतरही विरोधी पक्ष शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येतात. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट केला होता. त्यावेळी, त्यांना अटकही झाली. त्यामुळे, शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.  

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यातच, आता आमदार रवि राणा यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खासदार नवनीत राणा आणि मला १४ दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं, आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला, त्यामुळेच प्रभू श्रीराम यांनी उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावून घेतले, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा श्राप दिलाय, म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला, त्याचीच ही सजा त्यांना मिळाली आहे, असेही राणा यांनी म्हटले. 

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. मात्र, निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवली गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे आक्रमक, उच्च न्यायालयात

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर उद्याच सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. 
 

Web Title: "It was because of his opposition to Hanuman Chalisa that Lord Rama snatched his bow and arrow from shivsena.", MLA Ravi Rana on uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.