It is necessary to study the techniques of criminals - CM | गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करणे गरजेचे - मुख्यमंत्री

गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करणे गरजेचे - मुख्यमंत्री

मुंबई : पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषद झाली. त्या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्र सुरक्षित ठेवणाºया शूरवीर अशा पोलीस दलाचा गौरवोल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, गुन्ह्यांचे स्वरूप व गुन्हेगारांत खूप बदल झाला आहे. पोलीस दलात जसे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत तसेच गुन्हेगार, नक्षलवादीही सुशिक्षित असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करून तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करीत राहिले पाहिजे.
सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीस प्रशिक्षण बंधनकारक आहे. दुसरीकडे दहशतवादी कारवायांसाठी ६-७ वर्षांच्या मुलांना प्रशिक्षित केले जाते. अशा आव्हानांचा आपल्याला सामना करायचा असेल तर तसे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल. पोलिसांनी नि:स्वार्थी, नि:स्पृह काम करून सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल; पोलिसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. दलाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत आहेत. हे नवीन आव्हान आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. नवी मुंबईत महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, असेही ते म्हणाले.

या वेळी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केले. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण व पोलीस कल्याण आदींचे महासंचालक बिपीन बिहारी आदी उपस्थित होते.

‘गृहप्रकल्प वेळेत व्हावेत’

पोलिसांतील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्य शासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्र शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलिसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार व्हावीत. ती वेळेत पूर्ण व्हावीत. पोलिसांच्या शिक्षण घेणाºया मुलांसाठी वसतिगृहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतील. पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

Web Title: It is necessary to study the techniques of criminals - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.