'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 21:41 IST2025-11-03T21:38:33+5:302025-11-03T21:41:44+5:30
MNS BJP Breaking News: मतदार यांद्यातील घोळाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते एकवटले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने मतदार यांद्यातील दोष दाखवले जात असून, सत्याच्या मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली.

'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
"मतदार याद्यांतील घोळ, नावं गायब होणं, दुबार नोंदी आणि मतचोरीचे आरोप यावर भाजपची तळमळ आता उघडपणे दिसू लागली आहे", मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर दिले. दुबार मतदान झाले असल्याचे भाजपनेच मान्य केले आहे, असे सांगत राजू पाटलांनी मुद्द्यावर बोट ठेवले.
"दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केलंच! मतदार याद्यांतील घोळ, नावं गायब होणं, दुबार नोंदी आणि मतचोरीचे आरोप यावर भाजपची तळमळ आता उघडपणे दिसू लागली आहे", अशा शब्दात राजू पाटील यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला.
नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लिम कार्ड खेळून मुद्दा वळवायचा प्रयत्न
"निवडणूक आयोगावरील आरोप सुरू होताच भाजपची झोप उडाली, आणि नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लिम कार्ड खेळून मुद्दा वळवायचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण गंमत बघा शेलार यांच्या वक्तव्याने स्वतःच मान्य केलं की मविआ आणि मनसेच्या दुबार मतदारांबाबत भाजपलाच सगळं माहीत होतं. म्हणजेच घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही", असा पलटवार माजी आमदार राजू पाटील यांनी आशिष शेलार आणि भाजपवर केला.
जिथे बोट ठेवतो तिथे भाजप सापडतो
"भ्रष्टाचारावर बोट ठेवलं की भाजप चिडतो, कारण बोट जिथे ठेवतो तिथे भाजपच सापडतो. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही, उलट दिशाभूल करायची हीच त्यांची सोयीची पद्धत आहे. भाजपचा हा थयथयाट म्हणजे सत्याचा मुखवटा फाडून स्वतःचं कुरूप चेहरं दाखवणं! बाकी मायबाप जनता सुजाण आहेच त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवेल", अशी टीका राजू पाटील यांनी शेलारांच्या आरोपांना उत्तर देताना केली.
'शेलारांना भाजपमध्ये कुणी विचारत नाही'
"आशिष शेलार यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. एकतर सध्या भाजपमध्ये शेलारांना कुणी विचारत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे खातं दिलं आहे, त्या खात्यात दम नाही. त्यामुळे त्याचं जे वजन असायला हवं ते नाही. मुंबई प्रदेशाध्यक्ष पदही गमावलं आहे. तिथेही कुणी विचारत नाही. त्यामुळे आपण चर्चेत राहिलो पाहिजे या उद्देशाने आजची त्यांची पत्रकार परिषद होती", अशी टीका शेलारांवर देशपांडे केली.
दुबार मतदार आहेत, याच्याशी शेलार सहमत
"आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड मोर्चा झाला. त्या मोर्चामुळे भाजप घाबरलेला आहे. त्यामुळे शेलार पुढे आले आहेत. मूळात ते या गोष्टीशी सहमत आहे की, दुबार मतदार आहे. मग आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील, तर ते बाद झाले पाहिजेत. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. या मागणीशी शेलार सहमत आहेत का, ते त्यांनी सांगावं", असा उलट सवाल त्यांनी केला.