"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:02 IST2025-09-05T09:59:26+5:302025-09-05T10:02:36+5:30
Ajit Pawar Anjali Krishna IPS Anjali Damania: मुरूमाचं अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी दम दिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे.

"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटलं. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करू नका असं सांगताना अजित पवारांनी अंजली कृष्णा यांनाही दम दिला. अजित पवारांवर यामुळे टीकेची झोड उठली असून, अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला. अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरू उत्खनन सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी गेले होते. पण, काही लोक काठ्या घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. माहिती मिळताच करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या पथकासह तिथे गेल्या. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवा म्हणून सांगितले.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, "करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी?", असा सवाल त्यांनी केला.
"तुझे डेरिंग कसे झाले…. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे", अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.
अवैध उत्खनन करणाऱ्यांनीच केला अजित पवारांना कॉल
अंजली कृष्णा या कारवाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर मुरुमाचे अवैध उत्खनन करणााऱ्यांनी अजित पवारांना कॉल केला होता. कार्यकर्त्याने कॉल स्पीकरवर टाकून अंजली कृष्णा यांच्याकडे दिला होता. अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले, त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या की, माझ्या मोबाईलवर कॉल करा. त्यानंतर अजित पवार संतापले. तुमच्यावर कारवाई करून असा दमही अजित पवारांनी दिला.