काँग्रेसकडून उत्तर मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:58 AM2019-07-31T02:58:50+5:302019-07-31T02:59:02+5:30

इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गर्दी : माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती

Interviews of aspirants in North Mumbai from Congress | काँग्रेसकडून उत्तर मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखती

काँग्रेसकडून उत्तर मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखती

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी दुपारी बारानंतर भर पावसात उत्तर मुंबईतीलकाँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांतील १८ विधानसभानिहाय उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. मुसळधार पाऊस पडत असताना इच्छुक उमेदवारांनी वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवास करणे पसंत केले, तर इच्छुक उमेदवारांबरोबर समर्थकांनी गर्दी केली होती. उत्तर मुंबईतील काही इच्छुकांच्या मुलाखती माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्या, मात्र पाटील काही कामानिमित्त निघून गेल्याने मग उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती या माणिकराव ठाकरे यांनी घेतल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या ३१ जुलैला उत्तर मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व या तीन लोकसभा मतदारसंघांतील १८ विधानसभानिहाय मतदारसंघांतील इच्छुक काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. या सर्व मुलाखती माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील घेणार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. यामुळे निवडून येण्याची क्षमता आणि कडवी लढत देऊ शकतील, असेच तगडे उमेदवार उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस पक्ष देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसर, बोरीवली, मागाठाणे, चारकोप, कांदिवली पूर्व व मालाड या सहा विधानसभा मतदारसंघांतून महायुतीच्या उमेदवारांसमोर कडवी लढत देण्यासाठी काँग्रेसचे अनेक तरुण इच्छुक असून मतदारसंघातील त्यांचे संघटन कौशल्य, निवडून येण्याची क्षमता, कार्यकर्त्यांचे पाठबळ, जनसंपर्क बघून त्यांना संधी मिळण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली.

दहिसर विधानसभा मतदारसंघातून चौथी प्रसाद गुप्ता आणि किशोर सिंह यांच्यात चुरस आहे. अरुण सावंत, विकास पांडे, अझीझ शेख, शैलेंद्र सिंह यांनीदेखील येथून उमेदवारी मागितलेली आहे. चौथी प्रसाद गुप्ता हे युवक काँग्रेसपासून पक्षात कार्यरत आहेत. संजय निरुपम यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अन्याय झाला होता. त्यांच्या वॉर्डातून दिवंगत राजेंद्रप्रसाद चौबे यांना आणि त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले होते. तर एकदा महिला वॉर्ड झाल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र या वेळी चौथी प्रसाद गुप्ता यांचे नाव आघाडीवर असून किशोर सिंह यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे.

बोरीवली विधानसभा विभागात माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि कुमार खिल्लारे यांनी उमेदवारी मागितलेली असून त्यांच्या ऐवजी नवीन उमेदवाराला संधी मिळू शकेल अशी चर्चा आहे. शिवा शेट्टी यांचे काम जरी चांगले असले तरी येथील मराठी लोकसंख्या बघता येथे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. तर मनसे काँग्रेस आघाडीत सामील झाल्यास मागाठाणे विधानसभा आघाडी मनसेला ही जागा सोडण्याची शक्यता असून येथून नयन कदम यांचे नाव चर्चेत आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातदेखील मुंबई महिला अध्यक्षा डॉ. अजंठा यादव आणि राजेंद्र शिरसाट यांच्यात मोठी चुरस आहे. या विभागासाठी राजेंद्र प्रताप पांडे, वीरेंद्र सिंह, शिव सहाय सिंह, आनंद राय हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

Web Title: Interviews of aspirants in North Mumbai from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.