Uddhav Thackeray: "आमचा विठ्ठल चांगलाय; अवतीभवतीची बडवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 10:10 IST2022-06-23T10:05:32+5:302022-06-23T10:10:03+5:30
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray: "आमचा विठ्ठल चांगलाय; अवतीभवतीची बडवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही"
मुंबई- 'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा..' असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बुधवारी रात्री 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र भुयार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आमचा विठ्ठल चांगला आहे. बडवे मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही. उद्धव ठाकरेंच्या अवतीभवतीची माणसं त्यांना भेटू देत नाही, असा निशाणा देवेंद्र भुयार यांनी साधला आहे. तसेच या बडव्यांमुळे शिवसेनेते फूट पडल्याचा दावाही देवेंद्र भुयार यांनी केला आहे. त्यामुळे देवेंद्र भुयार यांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल
शिवसेनेतील आणखी ६ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादरमधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवली विभागाचे आमदार दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असून सूरतमार्गे गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण
मी पद सोडण्यास तयार- उद्धव ठाकरे
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.