आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:26 AM2019-08-13T03:26:38+5:302019-08-13T03:27:02+5:30

आपला तिरंगा ध्वज हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मग त्याला वंदन करून, देशाविषयी आदर, प्रेम व्यक्त करणे हे आपले कर्तव्य नाही का?

Independence of India long Live | आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

Next

- मानसी वैशंपायन
'अवनी, तुम्ही कुठे जाणार १५ आॅगस्टला? आई-बाबा एक दिवस रजा घेणार आणि जोडून सुटी असल्यामुळे आम्ही फिरायला जाणार,' सुहिताने विचारले. 'अगं पण शाळेत झेंडावंदन आहे ना, तू नाही येणार? आपला स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो ना आपण!' अवनी म्हणाली. 'मग त्यात काय झालं? तो तर दरवर्षीच असतो,' सुहिता म्हणाली. 'आणि या वर्षी १५ आॅगस्टला रक्षाबंधन हा सणही आहे किती मज्जा!' मी ताईला सरप्राइज गिफ्टपण देणार.' अन्वयने संभाषणात भाग घेतला. 'कोण देणार आहे सरप्राइज गिफ्ट?' कॉलेजमधून आलेल्या ताईने विचारले. 'ताई, ही सुहिता बघ १५ आॅगस्टला फिरायल चाललीय झेंडावंदन सोडून.' अवनीने तक्रार केली.

'सुहिता, अवनी, अन्वय इकडे या. तुम्ही इतिहासात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अभ्यास केलात ना? अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:ची हौसमौज, सुख बाजूला ठेवून देशासाठी प्राणपणाला लावले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्या पिढीने केवढी मोठी किंमत मोजली. या वर्षी स्वातंत्र्य दिनाला एक वेगळे महत्त्व आहे. त्याच दिवशी रक्षाबंधन आहे. आपल्या संस्कृतीत रक्षणकर्त्याला राखी बांधली जाते. जात, धर्म, भाषा, प्रांत या कुठल्याही सीमा या क्रांतिकारकांच्या ध्येयाच्या आड आल्या नाहीत. 'बंधुत्व' ही कल्पना त्यांना खरी कळली होती.

देशबांधवांच्या मुक्तीसाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केला. म्हणून आज आपण स्वायत्त, सार्वभौम भारतात स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. आपला तिरंगा ध्वज हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मग त्याला वंदन करून, देशाविषयी आदर, प्रेम व्यक्त करणे हे आपले कर्तव्य नाही का? प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाविषयी निष्ठा, अभिमान, भक्ती असायला हवी. सुहिता, फिरायला तर तू नंतरही जाऊ शकतेस ना?' ताईने विचारले. 'हो ताई, आज मला स्वातंत्र्याचे मोल कळले, मी आईबाबांनाही हे सांगेन आणि झेंडावंदनलाही जाईन,' सुहिता म्हणाली.

(लेखिका मुख्याध्यापिका आहेत.)
manasidhaval@gmail.com

Web Title: Independence of India long Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.