३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:51 IST2024-12-11T06:23:10+5:302024-12-11T06:51:02+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे.

३ वर्षांत बेस्ट अपघातात ६२ जणांचा गेला जीव, कंत्राटी बसचे ११४ तर स्वमालकीच्या बसने केले १३३ अपघात
- सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या २०२२ पासून ते आजतागायत झालेल्या अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात भाडे तत्त्वावरील बसचे एकूण ११४ अपघात झाले असून यातील ४० गंभीर स्वरूपाचे आहेत. तर दुसरीकडे बेस्टच्या स्वमालकीच्या बसचे या कालावधीत एकूण १३३ अपघात झाले असून त्यातील २२ गंभीर स्वरूपाचे असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, २०२४-२५ या एका वर्षाचा विचार केल्यास ओलेक्ट्रा कंपनीच्या बसकडून २, ईव्ही ट्रान्स कंपनीच्या बसकडून ८ तर टाटा मोटर्सच्या बसकडून २ असे एकूण १२ प्राणघातक अपघात झाल्याची नोंद आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे. बेस्ट ही मुंबईबरोबरच महानगर क्षेत्रातील काही भागांपर्यंत धावते. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ३५ लाखांपार गेली आहे.
मात्र आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे चालकाकडून बेस्ट बस वेगाने चालविणे, ओव्हरटेक करणे यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. बेस्ट बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपक्रमाकडून चालकांना प्रशिक्षण व जनजागृती, तसेच त्यांचे समुपदेशन करण्याचे काम केले जाते. यातून त्यांचा ताणतणाव कमी
करण्याचा प्रयत्न असतो. चालकांकडून शून्य अपघातांची नोंद व्हावी, यासाठी अशा चालकाचा वर्षातून एकदा सत्कारही केला जातो. जेणेकरून त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास मदत होते. बेस्ट बसचे अनेक अपघात हे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी खबरदारी न घेतल्यानेही होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बेस्टकडून इंडक्शन ट्रेनिंग
बेस्ट बसेस चालवण्याचा अनुभव असणाऱ्यांना बेस्टकडून ३ दिवसांचे तर अनुभव नसणाऱ्यांना कमीत कमी १५ दिवसांचे इंडक्शन ट्रेनिंग बेस्टकडून दिले जाते. मात्र सध्याच्या भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराच्या बसेसमध्ये चालकांच्या बाबतीत याची किती काळजी घेतली जाते यावर वाहतूक तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.