बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 10:27 AM2019-12-10T10:27:49+5:302019-12-10T10:28:54+5:30

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं.

Important meeting of MNS on changing political equation lead by Raj Thackeray | बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

Next

मुंबई - राज्यात गेल्या महिनाभरापासून सत्तासंघर्षाचे नाट्य रंगलं आहे. शिवसेना-भाजपा यांच्यातील युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मागील काही दिवस सुरु असलेल्या या नाट्यावर सत्तांतराने अंतिम पडदा पडल्यानंतर मनसे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. 

मनसेच्या या बैठकीला पक्षाचे सर्व सरचिटणीस,उपाध्यक्ष उपस्थित राहणार असून सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी घरोबा करत सत्तास्थापन केली आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. 

यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षासाठी पक्षाला मतदान करावं असं आवाहन केलं होतं. मात्र युती आणि आघाडीच्या तुलनेत स्बबळावर लढणाऱ्या मनसेला राज्यात केवळ १ जागा जिंकता आली. मनसेने या निवडणुकीत १०० च्या आसपास उमेदवार उभे केले होते. त्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. 
मनसेचा एकमेव आमदार राज्यात निवडून आला असला तरी मुंबई, ठाणे पट्ट्यात काही जागांवर मनसेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. विक्रोळी, मुलुंड, मागाठणे, भिवंडी ग्रामीण, दादर-माहिम, ठाणे, शिवडी, डोंबिवली आणि कोथरुड या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने भाजपाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीविरोधात आक्रमक प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता राज ठाकरेंनी भाजपाविरोधात प्रचारात रंगत आणली होती. 

यंदाच्या विधानसभेत मनसे आघाडीसोबत सहभागी होणार अशी चर्चा राज्यभरात होती. मात्र मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत न जाता स्वबळावर निवडणुका लढविल्या. मात्र काही जागांवर आघाडीकडून मनसेच्या उमेदवाराला ताकद देण्याचं काम पडद्यामागून झालं होतं. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलेलं असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचं सरकार राज्यात आलं आहे. सरकारच्या बहुमत चाचणीवेळीही मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती चर्चा होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Important meeting of MNS on changing political equation lead by Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.