आयआयटी मुंबईचे सौरदिवे अमेरिकेत उजळले; प्रकल्पाने पटकावले पहिले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:03 AM2019-10-03T06:03:26+5:302019-10-03T06:03:48+5:30

अमेरिकेत झालेल्या एम्पॉवर बिलियन लाइव्ह्स स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या सोल्स इनिशिएटिव्ह प्रकल्पाला पहिले स्थान मिळाल्याचे आयआयटी मुंबईकडून घोषित करण्यात आले आहे.

IIT Mumbai's solar lights illuminate the United States; The project won first place | आयआयटी मुंबईचे सौरदिवे अमेरिकेत उजळले; प्रकल्पाने पटकावले पहिले स्थान

आयआयटी मुंबईचे सौरदिवे अमेरिकेत उजळले; प्रकल्पाने पटकावले पहिले स्थान

Next

मुंबई : अमेरिकेत झालेल्या एम्पॉवर बिलियन लाइव्ह्स स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या सोल्स इनिशिएटिव्ह प्रकल्पाला पहिले स्थान मिळाल्याचे आयआयटी मुंबईकडून घोषित करण्यात आले आहे. २८ सप्टेंबर ते १ आॅक्टोबरदरम्यान झालेल्या अंतिम फेरीत आयआयटी सोल्सने हा बहुमान पटकावला. डिसेंबर २०१८ मध्ये दक्षिण एशिया प्रादेशिक फेरी जिंकल्यानंतर अंतिम फेरीसाठी या प्रकल्पाची निवड झाली होती. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि १ लाख अमेरिकन डॉलर असे असून ऊर्जाबचतीसाठी नवीन कल्पनांना वाव देणे हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मूळ उद्देश होता.
आज जगभरात कार्बन उत्सर्जनाची समस्या भेडसावत आहे. ती कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. भारतानेही यासाठी पुढाकार घेतला असून सौरऊर्जेचा अधिक वापर कसा करता येईल यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी सौरऊर्जेचा वापर करून गावागावांतील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला. पीएच.डी. करत असतानाच सौरऊर्जा साठवून ठेवणाऱ्या उपकरणांवर ते संशोधन करीत होते. याचा वापर करून त्यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण भागात दहा लाख सौरदिवे वाटले. तीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. याच प्रकल्पाने अमेरिकेतील एम्पॉवर बिलियन लाइव्ह्सची अंतिम फेरी गाठत तिथे पहिले स्थान पटकावले.
ऊर्जाबचत ही काळाची गरज बनत चालली आहे. सौर दिव्यांमुळे ऊर्जाबचत होणारच आहे, शिवाय कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनेही अशा प्रकारे पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या प्रकल्पाची निवड एम्पॉवर बिलियन लाइव्ह्सच्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही निवड सार्थ ठरवत या प्रकल्पाने येथे पहिले स्थान पटकावले आहे, अशी माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.
विजेचा वापर जेवढा वाढतो तेवढे कार्बन फूट प्रिंट वाढते. कार्बन उत्सर्जन कमी होण्याऐवजी ते वाढते. यामुळे केवळ सौरदिवे देऊन उपयोग नाही, जेव्हा घराघरांत सौरऊर्जेचा वापर होईल तेव्हाच खरे ध्येय साध्य होईल, अशी प्रतिक्रिया सोळंकी यांनी याबाबत बोलताना व्यक्त केली.

विविध देशांतील १० लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुढील वर्षभरात एक लाख घरांना सौरऊर्जेवर आणण्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया सोळंकी यांच्या टीमकडून देण्यात आली. केंद्र सरकारच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ते गेले वर्षभर जगभ्रमण करून विविध देशांमध्ये जाऊन सौरऊर्जेचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसाद देत विविध देशांतील दहा लाख विद्यार्थी त्यांनी यासंदर्भात २ आॅक्टोबर रोजी भारतात आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाले होते.

Web Title: IIT Mumbai's solar lights illuminate the United States; The project won first place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.