Join us  

त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 7:11 AM

भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच, शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

ठाणे : आणखी एका ‘लेटरबॉम्ब’ने राज्यात खळबळ माजली आहे. या वेळी हा ‘बॉम्ब’ टाकला आहे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खुले पत्र पाठवून सरनाईक यांनी त्यांना भाजपशी जुळवून घेण्याची आग्रहवजा विनंती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करीत आहेत. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच, शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडेच घेतलेली ‘वन-टू-वन’  भेट, काँग्रेसने सुरू केलेली स्वबळाची भाषा आणि आता सरनाईक यांचे हे पत्र यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ईडीच्या रडारवर आल्यानंतर ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार असलेले सरनाईक हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात आहेत. ते बेपत्ता झाल्याचे भाजपने त्यांच्या मतदारसंघामध्ये फलकही लावले होते. अशात ते अचानक या पत्ररूपाने अवतरले. पत्रात सरनाईक यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून उत्तम कार्य करीत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. 

कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करीत असतील तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे आपले वैयक्तिक मत आहे. भाजपशी जुळवून घेतले तर निदान माझ्यासह अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.   - प्रताप सरनाईक

त्रास दिला जात असल्याचा आरोप गंभीर

एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यावे असे काय आहे? महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. हा गंभीर आरोप आहे. विनाकारण त्रास कोण कुणाला देत आहे, तो त्रास काय आहे, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.    - खासदार संजय राऊत, शिवसेना नेते

सरनाईक आघाडी सरकारच्या मताचे 

सरनाईक यांनी काय पत्र दिले, हे मला माहीत नाही; पण ते आघाडी सरकारच्या मताचेच आहेत. शिवसेनेतून काँग्रेस-राष्ट्रवादीत नेते, कार्यकर्ते आल्याचे कुठेच दिसत नाही. त्यांच्या मतदारसंघात असा प्रकार घडला आहे का, हे तपासावे लागेल. पत्रामुळे वितुष्ट निर्माण होणार नाही. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राऊत यांनी पत्रातील एकच परिच्छेद वाचला  

शिवसेना आमदारांची अस्वस्थता, तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी यामधून स्पष्ट दिसते. परंतु, संजय राऊत यांना शिवसैनिकांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यांनी फक्त केंद्रीय यंत्रणांबाबतचा एकच परिच्छेद वाचला. राऊत शिवसेनेची काळजी घेतात की राष्ट्रवादीची, हे जनतेला माहिती आहे.     - प्रवीण दरेकर, विराेधी पक्षनेते

टॅग्स :प्रताप सरनाईकउद्धव ठाकरेभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार