'हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवा', जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 20:27 IST2024-02-06T20:26:48+5:302024-02-06T20:27:55+5:30
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

'हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवा', जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. राष्टवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रीया दिली.
"ही गोष्ट आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ज्यावेळी आमची राष्ट्रीय मान्यता काढली होती त्याच दिवशी पुढे काहीतरी घडणार आहे माझ्या मनात शंका आली होती. आमच्या दृष्टीने जे हवे ते आम्ही दिले होते. चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ या बोलीवरच हे ठरल आहे. ज्यांनी हा पक्ष सुरू केला त्याच्या हातातूनच हा पक्ष काढून घेतला आहे. शरद पवारांना या सगळ्याचे दु:ख होत आहे. हे पक्ष आणि चिन्ह काढून घेणार आम्हाला माहित होतं आमच चिन्हच शरद पवार आहेत. माझ आजही अजित पवार यांना आवाहन आहे नवीन पक्ष चिन्ह घेऊन मैदानात या असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
"आम्ही यांच्याविरोधात लढायला तयार आहोत आमची आमदारकी गेली तर गली, हा निकाल आम्हाला अपेक्षितच होतं. आमच नाव आणि चिन्ह हे शरद पवारच आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
शरद पवारांना मोठा धक्का
भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर आज निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.
दरम्यान, काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी शरद पवार गटाला आता पक्षाचं नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.