"शेतकऱ्यांना मदत करायची तर ताण सहन करावा लागेल"; पॅकेज जाहीर करताना CM फडणवीसांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:20 IST2025-10-07T15:16:06+5:302025-10-07T15:20:07+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केले.

"शेतकऱ्यांना मदत करायची तर ताण सहन करावा लागेल"; पॅकेज जाहीर करताना CM फडणवीसांनी केलं स्पष्ट
CM Devendra Fadnavis: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुती सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. राज्यात अतिवृष्टीमुळे ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असून एकूण सर्व प्रकारची मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी बोलताना या पॅकेजमुळे काही योजनांवर ताण येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील विविध योजनांवर ताण येण्याची शक्यता आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत मदतीची घोषणा केली. यावेळी बोलताना शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल कुठेतरी ताण सहन करावा लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
"शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल कुठेतरी ताण सहन करावा लागेल. बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अधिक खर्च आला तर काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर कमी खर्च करावा लागेल काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टींबाबत सांगता येत नाही. ज्यावेळी आम्ही रियल ऍप्रोप्रिएशन करू तेव्हा कळेल. आज आम्ही काय करतो आहोत. आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचे रियल ऍप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणे सुरू करत आहोत. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचे कुठे वाढवायचे हे बघितले जाईल. पहिली प्रायोरिटी शेतकऱ्यांना मदत करणे आहे ती आम्ही करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"खरडून गेलेली जमीन, शेती पिकांचं नुकसान, मृत जणावरांबाबत मदत, जखमी झालेल्या व्यक्तींना मदत म्हणून तात्काळ १० हजार रुपये देत आहोतज्या घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे त्यासाठी नव्याने घरे बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण ती घरे बांधणार आहोत. डोंगरी भागातील घरांना प्रत्येकी १० हजारांची जास्त मदत करत आहोत. ज्या दुकानदारांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनाही आपण मदत करत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.