Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो- संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 10:14 IST

राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत चाचणी घेण्याचं पत्र पाठवलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.

मुंबई- 

राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत चाचणी घेण्याचं पत्र पाठवलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रकरण कोर्टात असताना असं अधिवेशन बोलावणं असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझ्या बोलण्याचा जर इतका त्रास होत असेल तर मी थांबतो असंही आज संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

राज्यातील राजकीय घडामोडी LIVE UPDATE येथे क्लिक करा

बहुमत चाचणी घेत असताना राज्यपालांनी सरकारसमोर काही महत्वाच्या अटी ठेवल्या आहेत. यात राज्यातील काही नेत्यांकडून प्रक्षोभक विधान केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवावा अशी एक अट नमूद केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन केलेलं असताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या विधानांची आठवण करुन देत मुख्यमंत्र्यांचं आवाहन फेटाळून लावलं होतं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना संजय राऊत यांनी एक पाऊल मागे घेत महत्वाचं विधान केलं. "मी शिवसेनेचीच भूमिका मांडत असतो.  माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. याचा जर कुणाला त्रास होत असेल तर ठीक आहे मी बोलणं थांबवतो. आपण आधी मुंबईत या. पण मी बोलतोय आणि आदित्य ठाकरे बोलताहेत म्हणून येणार नाही हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते ठाकरे आहेत. त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. बंडखोरांनी आमच्या बोलण्याचं कारण देऊन अशी भूमिका घेणं योग्य नाही", असं संजय राऊत म्हणाले. 

आम्ही कोर्टात जाणार- राऊतबंडखोर आमदारांपैकी १६ जणांवर अपात्रतेची कारवाईचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे दिलेलं आहे आणि हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टानं ११ जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही राज्यपालांनी राफेल जेटच्या वेगानं अधिवेशन घेण्याची तत्परता दाखवली हे अत्यंत चमत्कारीक आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसंच राज्यपाल जर असं असंवैधानिक अधिवेशन घेत असतील तर त्याविरोधात आम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टात जाऊ, असंही राऊत म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळउद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊत