"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:43 IST2025-12-25T12:41:02+5:302025-12-25T12:43:34+5:30
Sanjay Raut Devendra Fadnavis: मनसे-उद्धवसेनेची युती झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही काय मालिश करण्यासाठी आला आहात का? असा सवाल त्यांनी केला.

"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी मनसे-उद्धवसेनेच्या युतीची घोषणा केली. त्यानंतर भाजपाकडून ठाकरे बंधूंवर निशाणा साधला जात आहे. राजकीय अस्तित्व आणि सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. या टीकेनंतर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर पलटवार केला. "जर तुम्हाला या युतीमुळे काहीच फरक पडणार नसेल, तर मग त्यावर प्रतिक्रिया का देत आहात? तोंडाची डबडी का वाजवत आहात?", असा सवाल राऊतांनी केला.
युतीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी मनसे-उद्धवसेना युती राजकीय अस्तित्वासाठी आणि सत्तेसाठी असल्याची टीका केली.
ही तुमची मराठी माणसासाठीची सेवा आहे का?
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "गौतम अदानींना मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसासाठी केलेले काम नाही. अदानीसारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणे किंवा फुकटात घशात घालणे ही मराठी माणसासाठी केलेली तुमची सेवा आहे का?", असा सवाल राऊतांनी केला.
"आमचे दोन ठाकरे एकत्र आले आहेत. तुम्ही तुमचे बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत, तर तुम्ही सगळे एकमेकांची चंपी-मालिश करण्यासाठी एकत्र आला आहात का? इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावले आहेत? तुम्ही आमची शिवसेना फोडली. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची संघटना निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लफंग्याच्या हातात दिलीत, हे तुमचे मराठी प्रेम आहे का?", असे संजय राऊत म्हणाले.
मराठी माणसासाठी केलेली दहा कामे दाखवा
"भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता भाजपाच्या एकाही नेत्याने अखंड महाराष्ट्र, बेळगाव, कारवार सीमा प्रश्न किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधी आवाज उठवला आहे का? मराठी माणसासाठी केलेली तुमची दहा कामे आम्हाला दाखवा", असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले.
"चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत होते, तेव्हा त्यांच्याविरोधात ठाकरे उभे राहिले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारण्याचे कर्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांचे होते, पण त्यांनी ते केले नाही. मग आता आम्हाला मराठी माणसाच्या गोष्टी का शिकवत आहात?", अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली.