मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे. मात्र राज्यात सत्तेवर असलेले भाजपा आणि शिवसेना हे पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की गेल्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यास त्यांना किती जागा मिळतील, याचा सर्व्हे समोर आला आहे. झी २४ ताने केलेल्या सर्व्हेनुसार भाजपा आणि शिवसेना हे पक्ष युती करून विधानसभा निवडणूक लढले तर दोन्ही पक्षांना २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील. युती करून लढल्यास भाजपाला १४३ तर शिवसेनेला ८३ जागा मिळतील. भाजपा आणि शिवसेना एकत्र लढल्यास काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची मोठी घसरगुंडी उडण्याची शक्यता असून, त्या परिस्थितीत या दोन्ही पक्षांना प्रत्येकी २६ जागा मिळतील. तर इतर पक्षांच्या खात्यात १० जागा जातील. दुसरीकडे भाजपा आणि शिवसेना यांनी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसेल, असे हा सर्व्हे सांगतो. स्वबळावर लढताना भाजपाला १२२ जागा मिळतील. तर स्वबळावर लढल्यास शिवसेनेची मोठी घसरण होणार असून त्यांना २०१४ च्या तुलनेत कमी म्हणजे ५२ जागा मिळतील.
भाजपा-शिवसेना युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी होईल सपाट, पण वेगळे लढल्यास 'वेगळं' चित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 11:09 IST