'... तर मी पर्वा केली नसती, पण अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतेय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:21 IST2020-06-01T13:20:46+5:302020-06-01T13:21:39+5:30
पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलंय.

'... तर मी पर्वा केली नसती, पण अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतेय'
मुंबई - भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून दरवर्षी लाखो कार्यकर्ते गोपीनाथ गडावर एकत्र येतात. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंसह संपूर्ण मुंडे कुटुंबाची हजेरी असते. तसेच, पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतात. मात्र, देशातील, राज्यातील कोरोनाची अन् लॉकडाऊनची परिस्थिती पाहता यंदाचा पुण्यतिथी कार्यक्रम अतिशय साधेपणाने करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन सांगितले. तसेच, अगदी मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेत असल्याचेही पंकजा यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंना बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले असून ३ जून रोजी परळीतील कार्यक्रमासाठी आखलेला बीड दौरा रद्द करण्याची विनंती केल्याचे पंकजा यांनी सांगितले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि ३ जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली, पण #Lockdown होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा ३ जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. कारण, मी जरी लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने पोलिसांचा अंदाज आहे की, त्याठिकाणी स्थानिक व इतर जिल्हयातील लोकं मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल, नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे #covid19 च्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे नियमाप्रमाणे मला जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, माझी आज १ जूनची जी परवानगी होती आणि मी सकाळी परळीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे, तो प्रवास रद्द करावा. त्यामुळे मी परळीचा दौरा रद्द करत असल्याचं पंकजा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.
मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खा. प्रीतम ह्या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन #Live करतील. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, जे मला फोन करत आहेत ताई, तुम्ही कधी निघताय, कधी निघताय.. पनवेल, नवी मुंबई, पुणे, शिक्रापूर, नगर, जामखेड, पाथर्डी, आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड सगळीकडचे लोक आम्ही निघतोय असे म्हणत आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी मी जशी आपल्याला सूचना केली आहे, त्याप्रमाणे घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याचवेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया.. असे पंकजा यांनी म्हटले आहे.
मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता. एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करण्यासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी, असे भावनिक आवाहनही पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.