"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 17:22 IST2025-11-23T17:19:31+5:302025-11-23T17:22:39+5:30
Anant Garje News: स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे फरार झाले. या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली.

"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Pankaja Munde Anant Garje News: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या घरात ही घटना घडली. या घटनेपासून अनंत गर्जे फरार आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी एका निवेदनातून या प्रकरणी भाष्य केले आहे. अनंतचा मला कॉल आला होता. तो खूप रडत होता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, "काल, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजता माझा पीए अनंतचा कॉल माझ्या दुसऱ्या पीएच्या मोबाईल आला होता. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले."
पोलिसांना सांगितले आहे की...
"ही गोष्ट माझ्यासाठी देखील खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये. त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे", असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
"गौरीच्या वडिलांशीही मी बोलले. ते प्रचंड दुःखात आहेत, हे मी समजू शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं, हे अनाकलीयन आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे", अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावर बोलताना दिली.
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल
पोलिसांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद शीतल आंधळे आणि दीर अजय भगवान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी पालवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गौरी पालवे यांची नणंद शीतल आंधळे ही गौरीवर दबाब टाकत होती. तिला सोडून जा म्हणत होती. तुला नांदायचं असेल, तर नाद नाही तर आम्ही दुसरं लग्न करून घेऊ, असे म्हणायची.
डॉक्टर गौरी पालवे या शनिवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी १ वाजता ड्युटीवरून घरी आल्या होत्या. बीडीडी चाळीतील फ्लॅटमध्ये ते राहत होते. त्यानंतर त्यांच्या प्रचंड वाद झाले आणि गौरीने आत्महत्या केली.