ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:08 IST2024-01-16T06:12:48+5:302024-01-16T07:08:15+5:30
शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे.

ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे.
शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होतेय तर त्यांचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही, असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या त्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या १४ आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
६४५ पानांची याचिका
अध्यक्षांनी राजकीय पक्ष शिंदे यांचा असल्याचे शिक्कामोर्तब करताना १४ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला. या निर्णयात त्रुटी असून तो रद्द करावा, अशी मागणी करणारी ६४५ पानांची याचिका गोगावले यांनी दाखल केली आहे.