पोषण आहारातील हिरवा वाटाणा पांढरा कसा झाला? होणार चौकशी, सचिव दर्जाचा अधिकारी नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:51 IST2026-03-18T12:50:36+5:302026-03-18T12:51:00+5:30
शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा...

पोषण आहारातील हिरवा वाटाणा पांढरा कसा झाला? होणार चौकशी, सचिव दर्जाचा अधिकारी नेमणार
मुंबई : शालेय पोषण आहारात निविदेमध्ये हिरवा वाटाणा असा उल्लेख होता, प्रत्यक्षात त्यापेक्षा किलोमागे १०० रुपये कमी भाव असलेल्या पांढऱ्या वाटाण्याचा पुरवठा करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याच्या मुद्यावरून सत्तारूढ आणि विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर या प्रकरणी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.
उद्धवसेनेचे कैलाश पाटील यांनी या बाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. हिरव्या वाटाण्याऐवजी पांढरा वाटाणा पुरवठादाराने पुरविला आणि कोट्यवधी रुपये जादाचे कमावले. या घोटाळ्यात शिक्षण संचालकही सामील होते. मी या प्रकरणी तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. कोण आहेत हे पुरवठादार? ते सरकारचे जावई आहेत का? पगारिया, जाधव यांना का वाचविले जात आहे, असा हल्लाबोल कैलाश पाटील
यांनी केला.
पुरवठ्याचे काम महिला बचत गटांकडे सोपवा
काँग्रेसचे नितीन राऊत यांनी हे गुन्हेगारी षडयंत्र असून, हिरव्या वाटाण्याच्या नावाखाली पुरवठादारांना दिलेली जादाची रक्कम त्याच्याकडून वसूल करावी, तसेच या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली. शिंदेसेनेचे रमेश बोरनारे यांनी बड्या पुरवठादारांऐवजी शालेय पोषण आहाराचे संपूर्ण काम हे महिला बचत गटांना द्यावे, पुरवठादारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.
मुख्याध्यापकांना कशाला जबाबदार धरता?
हिरवा वाटाणासह १२ अन्नपदार्थांचा पुरवठा केला जातो, नियमाप्रमाणे पुरवठा केला जात आहे की नाही याची खातरजमा शाळा मुख्याध्यापकांनी करायला हवी, असे मंत्री दादा भुसे एका प्रश्नात म्हणाले तेव्हा निविदेत नमूद केलेल्या वस्तूंचा पुरवठा हा पुरवठादार करत नाही, त्यांच्यावर कारवाई करा, मुख्याध्यापकांना कशाला जबाबदार धरता, असा सवाल कैलाश पाटील
यांनी केला.
हिरवा हवा असताना पांढरा वाटाणा कसा?
मंत्री दादा भुसे यांनी मान्य
केले की हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा यांच्या दरात मोठा फरक आहे. निविदेमध्ये हिरवा वाटाणा असा उल्लेख होता आणि पुरवठा पांढऱ्या वाटाण्याचा करण्यात आला.
या प्रकरणी एक महिन्याच्या
आत चौकशी केली जाईल. मात्र, भुसे यांच्या या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली. तेव्हा आयुक्तांमार्फत चौकशीची घोषणा मंत्री भुसे यांनी केली, शेवटी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सचिवांमार्फत चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली.
या चौकशीत जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.