'Government will take initiative to give ownership rights to the home of police' | 'पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी सरकार पुढाकार घेईन' 
'पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी सरकार पुढाकार घेईन' 

मुंबई : पोलिसांच्या शासकीय घरांबरोबरच त्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पोलिसांच्या स्वतःच्या घरांसाठी आखण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान देऊन मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई पोलिसांच्या पोलीस कल्याण विभागाच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहा नवीन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रसाद लाड, पोलीस आयुक्त संजय बर्वे, सहपोलिस आयुक्त नवल बजाज, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या मुलींना शिक्षणाच्या मदतीसाठी सुरू केलेली सुकन्या योजना, आरोग्यासाठीची हेल्थिझम कार्ड, मुलांच्या शिक्षणासाठीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म टॉपर्स ॲप्स, संगणक प्रशिक्षण वर्ग, पोलिसांच्या वैयक्तिक खटल्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला, वाहतूक पोलिसांना गॉगल्स वाटप या योजनांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलिसांचा कोणताही प्रस्ताव आल्यास  तो तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात पोलिसांच्या शासकीय अथवा मालकी हक्कांच्या घरासंदर्भात अनेक निर्णय घेतले. त्यामुळे याकाळात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली आहे. तसेच घरे देण्याची गतीही वाढली आहे. पोलिसांसाठी नवीन कॉलनी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या कॉलनीमध्ये इतर सुविधाबरोबरच जिम व मुलांसाठी कौशल्य विकास केंद्र असावे, यावर लक्ष दिले आहे.

पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी व्याजदर योजना, नोंदणी व मुद्रांक शुल्कात सवलत, चटई क्षेत्रात सूट आदी महत्वपूर्ण निर्णय घेतले. विविध योजनांच्या माध्यमातून पोलिसांना परवडणाऱ्या दरात घरे मिळण्यासाठी राज्य शासन नेहमीच पुढाकार घेईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. पोलीस दल हे एक कुटुंब असून या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आरोग्य, शिक्षण आदींच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात पोलिसांना आपल्या व आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे हेल्थिझम कार्ड उपयुक्त ठरेल. निवृत्त पोलिसांना आरोग्यविषयक योजना नव्हत्या. त्यामुळे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत निवृत्त पोलिसांचा समावेश केला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गृहराज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, मुंबई शहर हे अद्भूत शहर असून या शहरासमोरील आव्हाने वेगळी आहेत. याबरोबरच नवनवीन बदलत्या तंत्रज्ञानांमुळे हे आव्हान वाढले आहे. मात्र, मुंबई पोलीस अतिशय सक्षमतेने हे आव्हान पेलत आहेत. अशा पोलिस खात्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात आमुलाग्र बदल केले आहेत. सीसीटीव्ही, सीसीटीएनएस, सायबर पोलीस असे अनेक उपक्रम सुरू केले. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणसाठी 2 हजार 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. पोलिसांना पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या आकाराची घरे देण्यात येत आहेत.
आयुक्त बर्वे यांनी विविध योजनांची माहिती व त्या सुरू करण्याची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी सुकन्या योजनेतील पोलिसांच्या पाच मुलींना धनादेश देण्यात आला तसेच हेल्थिझम कार्डचेही प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आला. 
 


Web Title: 'Government will take initiative to give ownership rights to the home of police'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.