मुंबईचं गोरखपूर; त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:27 PM2019-10-06T17:27:52+5:302019-10-06T17:29:01+5:30

संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्याची ओळखपत्रासह तपासणी, प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करत होते.

Gorakhpur, Mumbai; What did the government do by arresting those 90 people? - Awhad | मुंबईचं गोरखपूर; त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? - आव्हाड

मुंबईचं गोरखपूर; त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? - आव्हाड

googlenewsNext

मुंबई - विकासाच्या नावाखाली हे काय चाललंय? परवा रात्री या संहाराच्या विरोधात आंदोलन करणारे कुणी मोठे नेते नव्हते. त्यांची कुठल्या राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. ते सारे मध्यमवर्गीय, नोकऱ्या करणारे, कॉलेजात शिकणारे विद्यार्थी होते. त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? ऑक्सिजनच्या अभावामुळे गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचं गोरखपूर करायच्या वाटेवर आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

आरेमधील वृक्षतोडीवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालवल्या आहेत. एखादी भीषण दंगल होऊन गेल्यानंतर जसं तणावपूर्ण वातावरण असतं, तसं वातावरण काल आरेच्या जंगलामध्ये होतं. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्याची ओळखपत्रासह तपासणी, प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीला, तिचे आदिवासी वडील आपल्या पाडयातून तिचं आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी अडकवून ठेवलं होतं असा आरोप त्यांनी केला 

तसेच फरक इतकाच की, तिथे दंगल/ हत्याकांड सरकारच करत होतं. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबवण्यासाठी जे कोणी पुढे येतील त्यांना अडवण्यासाठी हा पोलिस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारं सरकार स्वतः पर्यावरणाचा विध्वंस करत होतं. मी दुपारी तीनच्या सुमारास तिथे पोचलो तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत याची खात्री पटली. आमदारकीचा तोरा मिरवण्यात अर्थ नव्हता. पोलीस बिचारे "वरून" आलेल्या हुकुमाला बांधील होते. त्याच वेळी जंगलातल्या आदिवासी पाड्यामध्ये राहणारी एक महिला आमच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा न् खडा माहिती होती. आपली झाडं का पडली जात आहेत हा यक्षप्रश्न तिलाही पडला होता असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 

तसेच पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आम्ही जंगलात प्रवेश केला. काही अंतर मोटारसायकलने पार केलं. जिथे झाडं कापली जात होती तिथपर्यंतचं साधारण 9 किलोमीटरचं अंतर आम्ही पायी गेलो. ही वृक्ष छाटणी स्वतःच्या डोळ्यांनी पहायची असा निर्धार केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत तिथे प्रवेश करण्याचा हा एक चित्तथरारक अनुभव होता. तिथे पोहोचल्यानंतर मात्र जे दृश्य दिसलं ते हृदयद्रावक होतं. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडं छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटात ७०/८० वर्षाचं झाड भुईसपाट होत होतं. त्यांच्या फांद्या छाटून ओंडके ट्रक मध्ये भरायचं काम झपाट्याने चालू होतं असं आव्हाड म्हणाले.  

पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो तेव्हा डोळ्यात पाणी आलं. मुंबई ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वतःच निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढलं अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी घडलेला प्रसंग सांगितला आहे. 

Web Title: Gorakhpur, Mumbai; What did the government do by arresting those 90 people? - Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.