Join us

'शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, आर्थिक मदत करा'; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 23:22 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

मुंबई - जून महिना संपून जुलै महिना सुरु झाला तरी राज्यातील मराठवाड्यासह काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाचा पेरा अजूनही झालेला नाही. विशेषतः विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी पेरा खूपच कमी झाला आहे. पेरणीची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व शेतातील इतर कामांसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, शेतकरी नेहमीच सुलतानी किंवा आस्मानी संकटाचा सामना करत असतो. शेतकऱ्याला आधार देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे सरकार म्हणून आपले कर्तव्य आहे. पावसाअभावी ज्वारी, उडीद, सोयाबिन, तूर, भुईमूग, बाजरी, नाचणी पिकांचा पेरा अत्यंत कमी झाल्याचे दिसत आहे. खरिपाचा पेरा वेगाने व वेळेत व्हावा हे लक्षात घेता पेरणीसाठी मोफत बि-बियाणे देण्यात यावे तसेच पेरणीसह शेतातील इतर कामासाठी रोख मदत देण्यात यावी. त्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश द्यावेत.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंकडे शेतकऱ्यांसंदर्भातील मागणी केली आहे. तर, शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही हे सरकार शेतकऱ्यांसाठी, आणि  शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे उद्देश ठेवून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :एकनाथ शिंदेनाना पटोलेमुख्यमंत्रीशेतकरी