ब्रेकअप केलं आणि तिने दुसऱ्या मुलासोबतचे फोटो...; मुंबईत १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने आई कामावरच जाताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:23 IST2026-02-17T12:20:38+5:302026-02-17T12:23:06+5:30
Mumbai Crime News: मुंबईतील वडाळा भागात एका १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्याच्या गर्लफ्रेंड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकअप केलं आणि तिने दुसऱ्या मुलासोबतचे फोटो...; मुंबईत १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने आई कामावरच जाताच...
मुंबईतील वडाळा भागात एका १७ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्याने घरातच सोमवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी घरातच गळफार घेतला. ब्रेक केल्यानंतर गर्लफ्रेंडकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. तसेच तिचे दुसऱ्या मुलासोबतचे फोटो बघून तो नैराश्यात गेला होता.
सोमवारी दुपारी मयत विद्यार्थ्याची आई ठाणे रुग्णालयात नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. घरात मुलगा एकटाच होता. संध्याकाळी त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आईने त्याच्या मित्रांना घरी जाऊन बघायला सांगितलं. मुलांनी घरात डोकावून बघितल्यानंतर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ब्रेकअप, गर्लफ्रेंडचे दुसऱ्या मुलासोबत फोटो
प्राथमिक तपासातून काही माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी सांगितले की, मयत मुलाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचं ब्रेकअप झाले. त्यानंतर गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांनीही त्याला भेटण्यापासून रोखले होते.
ब्रेकअप झाल्यामुळे तो तणावात होता. त्यातच ब्रेकअपनंतर त्या मुलीने दुसऱ्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याला त्रास देण्यासाठी तिने हे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्येही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
खालच्या जातीतील असल्याने संबंध तोडले
मयत मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, मुलीने खालच्या जातीतील असल्याने मुलाशी संबंध तोडल्याचा आरोप केला आहे. तू खालच्या जातीतील असल्याने तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही, असे ती त्याला म्हणाली होती.
मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला सेवरी परिसरात येण्यापासून मज्जाव केला होता. त्यामुळे दोघांमधील बोलणं पूर्णपणे बंद झाले होते. तो एकाकी पडला. त्यातच मुलगी तिच्या सोशल मीडियावर इतर मुलांसोबत फोटो शेअर करू लागली होती. त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला.
मयत मुलगा दिवा येथील सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण घेत होता. तर त्याची आई ठाणे शासकीय रुग्णालयात कार्यरत आहे. मुलगा वडाळा पूर्व मधील गिरिधर तांबा परिसरात आईसोबत राहत होता.