कचरावेचक ठेकेदारावर गोळीबार; दुचाकीवरून आले हल्लेखोर, दोन दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 07:07 IST2025-01-04T07:04:58+5:302025-01-04T07:07:57+5:30
ठोके हे साथीदारांसह चहा पीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पाच राउंड गोळ्या झाडल्या...

(छाया : संदेश रेणोसे)
नवी मुंबई : एपीएमसी भाजी मार्केटमधील ओला कचरा उचलणारे ठेकेदार राजाराम ठोके यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना सानपाड्यातील डीमार्टसमोर घडली. ठोके हे साथीदारांसह चहा पीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पाच राउंड गोळ्या झाडल्या. त्यापैकी चार गोळ्या लागल्याने ठोके गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजाराम ठोके हे दोन साथीदारांसह डीमार्टसमोर चहा पीत गाडीत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने ठोके यांच्यावर पाच राउंड गोळ्या झाडून पळ काढला. त्यापैकी चार गोळ्या ठोके यांच्या छाती व पोटावर लागल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या साथीदारांनी त्यांना वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना कळवताच गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे, मयूर भुजबळ यांच्यासह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान डीमार्ट व इतर सीसीटीव्हीत हल्लेखोर हल्ला करून पळून जाताना दिसून आले आहेत. यावरून त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची पथके तयार केली आहेत.
वेळेत उपचार मिळाल्याने वाचले प्राण
ठोके यांना चार गोळ्या लागल्या असून, थोडक्यात त्यांचे प्राण वाचले आहेत. घटनेवेळी सोबत असलेल्या दोन मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
देशी कट्टा वापरल्याचा अंदाज
हल्लेखोरांनी ठोके यांच्यावर गोळीबार करण्यासाठी देशी कट्टा वापरल्याचा प्रथमदर्शनी अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी पाच पुंगळ्या मिळाल्या असून, त्या देशी कट्ट्याच्या असल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी आलेली धमकी?
ठोके हे आरटीआय कार्यकर्ता तसेच ठेकेदार आहेत. यातून त्यांचे अनेकांसोबत वाद असून, दोन दिवसांपूर्वी त्यांना एका व्यक्तीकडून धमकी मिळालेली, असेही समजते. तर ठेक्याच्या वादातूनच २०२३ मध्ये ठोके यांच्यावर हल्ल्याचा बनाव झाला होता.
सानपाड्यातील डीमार्टसमोर गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामा करताना गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमचे पथक. इन्सर्टमध्ये गोळीबार झालेली गाडी.