Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:13 PM2021-07-31T14:13:56+5:302021-07-31T14:39:26+5:30

सन 1968 साली वयाच्या 35 वर्षी गणपतराव देशमुख यांनी केशवराव राऊत यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1972 त्यांचा पराभव झाला होता, पण पोटनिवडणूक जिंकून ते पुन्हा आमदार बनले.

Ganpatrao Deshmukh : Abasaheb who immortalizes loyalty! ganpatrao deshmukh leader of people, farmer and worker | Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब!

Ganpatrao Deshmukh : एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... एकनिष्ठेला अजरामर करणारे आबासाहेब!

Next
ठळक मुद्दे मी हयात असेपर्यंत शेकापचाच दुसरा आमदार सांगोल्यातून निवडून आणायचाय. निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन. पण माझ्या माघारी शेकापचं भवितव्य काय?

मयूर गलांडे

मुंबई - देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी जिल्हा बोर्डावर ज्या पक्षातून काम केलं, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. शारदाबाईंच्या याच साम्यवादी विचारांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता बनून गपणतराव देशमुखांनी महाविद्यालयीन जीवनातून चळवळीत भाग घेतला. चळवळीतला हा कार्यकर्ता ओघाने राजकारणात आला अन् आदर्श राजकारणाचा एक अध्यायच आबासाहेबांनी लिहिला. आपल्या 54 वर्षांच्या राजकारणात माणसांवर आणि स्वत:च्या पक्षांवर नितांत प्रेम त्यांनी केलं. शेतकरी, कामगारांच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी आयुष्य वेचलं. म्हणूनच, अखेरच्या श्वासापर्यंत कार्यकर्त्यांचंही निस्सीम प्रेम आबांना मिळालं. आबांच्या जाण्यानं आता महाराष्ट्रात उरल्यासुरल्या शेकापमध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. तर, महाराष्ट्र अथांग अशा अनुभवसागराला मुकलाय. 

शेकाप नेते आणि स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव यांच्या विचारांचा पगडा गणपतराव यांच्यावर होता, त्यांच्यासोबतच ते शेकापच्या चळवळीत गणपतराव सहभागी झाले. त्यानंतर, पुण्यात एलएलबीचं शिक्षण घेत असताना ब्राह्मणेत्तर चळवळीचे शंकराव मोरे आणि केशवराव जेधे यांच्याशी ते जोडले गेले. इथूनच त्यांच्या चळवळीला आणि कामगार, शेतकऱ्यांसाठीच्या कामाला गती मिळाली. मी आंदोलन आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याचा पिंड असलेला माणूसंय. पण, कंस्ट्रक्टीव्ह विकासासाठी तुम्हाला राजकीय वजन असावं लागत, त्यासाठी जनाधार आणि आमदार, खासदार असावं लागतं. त्यासाठी इलक्शन जिंकावं लागतं. म्हणून मी राजकारणात आलो, असं गणपत आबा म्हणायचे.

सन 1968 साली वयाच्या 35 वर्षी गणपतराव देशमुख यांनी केशवराव राऊत यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री केली. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1972 त्यांचा पराभव झाला होता, पण पोटनिवडणूक जिंकून ते पुन्हा आमदार बनले. त्यानंतर, 1995 मध्ये शहाजीबापू पाटील यांच्याकडूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्याहीवेळेस केवळ 192 मतांनी ते पराभूत झाले होते. मात्र, 1999 मध्ये पुन्हा ते आमदार बनले. आपल्या 54 वर्षांच्या प्रदीर्घ राजकारणात ते 1978 व 1999 मध्ये मंत्रीही राहिले आहेत. आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील लोकांचं आयुष्यमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. म्हणून सर्वपक्षीय नेत्यांना आवडणारा शेकापचा नेता अशी आबाासाहेबांची विधानसभेतील ओळख बनली होती. आबांच्या निधनानंतर दिग्गजांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या कार्याची उंची दाखवतात. जयंतरावांनी दिलेली 'महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह'... ही उपाधी आबांना तंतोतंत लागू पडते. 

महिलांची स्वतंत्र सूतगिरणी उभारली 

गणपतरावांच्या पुढाकारानेच सन 1984 मध्ये सांगोला शहरात 45 हजार स्पींडलची सहकारी सूतगिरणी उभारली. शेतकरी सहकारी तत्वावर ही गिरणी मोठ्या नफ्यात चालवूनही दाखवली. त्यानंतर, कापसाची लागवड नसलेल्या सांगोल्यात महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी उभारण्याचं धाडसंही आबांनी दाखवलं. त्यातूनच, 25 हजार स्पिंडलची महिला सहकारी सूतगिरणी उभी केली अन् आशिया खंडातील नावाजलेली महिलांची सूतगिरणी म्हणून नावलौकिकही मिळवला. या गिरणीत झाडूवाल्या बाईपासून ते मॅनेजिंग डिरेक्टरपर्यंत महिलाच काम करतात. तालुक्यातील शेकडो माता-भगिनींना हक्काचा रोजगार आबांनी या सूतगिरणीतून मिळवून दिला. शेतकऱ्यांना, कामगारांना आर्थिकदृष्या सक्षम केलं. आज त्याच्या सूतगिरणीच्या प्रांगणात आबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.  

टेंभू, म्हैसाळ योजनेसाठी लढा

पश्चिम महाराष्ट्रातील 13 दुष्काळी तालुक्यासाठी म्हैसाळ आणि टेंभू सारख्या योजनांमधून सिंचनाचे पाणी गावापर्यंत आणण्यातही आबांचा सिंहाचा वाटा आहे. या योजनेमुळे तब्बल 160 किमी दूरपर्यंत पाण्याचा प्रवास झाला आहे. त्यासाठी, आबांच्या नेतृत्त्वात गल्लीपासून दिल्लीपर्यंत दुष्काळ परिषदा झाल्या आहेत, आंदोलनं झाली आहेत. त्यामुळेच, ही योजना पूर्णत्वास आल्याचे सांगताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गणपत आबांचा आवर्जून उल्लेख केला होता. म्हणूनच, आज येथील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली झिरपलंय. 

54 वर्षे एकाच पक्षातून आमदार 

महाराष्ट्रात रायगडसह नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्ह्यांमध्ये शेकापचं नेतृत्व होतं. पण, काळाच्या ओघानं श्रीमंत राजकीय पक्षांच्या तडजोडीच्या राजकारणात शेकापच्या नेत्यांना तग धरता आला नाही. त्यामुळेच, रायगडमध्ये जयंत पाटील अन् सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांनीच शेकापचा गाडा हाकला तो शेवटपर्यंत. गणपतराव देशमुखांनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षनिष्ठा सांभाळली, 54 वर्षे एकाच पक्षाचा आमदार बनून विधानसभेत पोहोचण्याचा विक्रमच त्यांनी करुन दाखवला. पक्षनिष्ठेचा परिपाठच त्यांनी घालून दिला. कपडे बदलावं तसं पक्ष बदलणारं राजकारण सुरू असतानाही शेकापचा एकमेव आमदार दिपस्तंभासारखा उभा होता. आज, हा दिपस्तंभ ढासाळलाय. पण, येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी इतिहासाचा शिलालेख बनलाय.

2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतआबांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून आबाही गहिरवले होते. मात्र, मला शेकापला सांगोल्यात जिवंत ठेवायचंय. त्यामुळे, मी हयात असेपर्यंत शेकापचाच दुसरा आमदार सांगोल्यातून निवडून आणायचाय. निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन. पण माझ्या माघारी शेकापचं भवितव्य काय? भविष्यात शेकापचं तत्त्वज्ञान तालुक्यात टिकलं पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक लढवणार नसल्याचं आबांनी सांगितलं.

त्याचवेळी, दुसरीकडे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेते रात्रीत पक्ष बदलत होते, मंत्रीपदाच्या अपेक्षेनं पक्षांतर करत होते. बंडखोरांची फौज तयार होत होती. मात्र, त्या राजकीय धुंदीतही केवळ पक्षाच्या भवितव्यासाठी निवडणूक न लढवणारे फक्त आणि फक्त गणपतराव देशमुखच होते, सांगोल्याचे आबासाहेबच होते. आज आबासाहेब आपल्यात नाहीत, पण जाताना पक्षनिष्ठेला अजरामर करुन गेले.... पक्षनिष्ठेचा परिपाठ घालून गेले....एक पक्ष, एक मतदारसंघ, एक ध्यास... सांगत अजरामर झाले....

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ganpatrao Deshmukh : Abasaheb who immortalizes loyalty! ganpatrao deshmukh leader of people, farmer and worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app