फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाची २५ हजार डॉलर्सची फसवणूक; त्रिकूटाला बेड्या 

By मनीषा म्हात्रे | Published: March 6, 2024 07:22 PM2024-03-06T19:22:05+5:302024-03-06T19:24:32+5:30

गोस्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार हे २७ फेब्रुवारीला पत्नीसोबत युएस डॉलर्स घेऊन कृष्णन याला भेटण्यासाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये गेले.

Fraud of 25 thousand dollars by a foreign currency exchange trader | फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाची २५ हजार डॉलर्सची फसवणूक; त्रिकूटाला बेड्या 

फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाची २५ हजार डॉलर्सची फसवणूक; त्रिकूटाला बेड्या 

मुंबई: फिल्म लाईनच्या व्यवसायात असल्याची बतावणी करत फॉरेन करन्सी एक्सचेंज व्यावसायिकाकडून २५ हजार अमेरिकन (युएस) डॉलर्स घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष आठने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने माजिद खान उर्फ मन्नू (४४), मयंक शर्मा उर्फ लड्डू (२२) आणि आकाश अग्रवाल उर्फ कबीर उर्फ कब्बू (१९) यांना बेड्या ठोकल्या असून मुख्य सूत्रधार कृष्णन याचा पोलीस शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्लेतील रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय तक्रारदार यांचा विदेशी चलन बदलून देण्याचा (फॉरेन करन्सी एक्सचेंज) व्यवसाय आहे. दिल्लीमधील ट्रॅव्हलींग व्यावसायिकाने त्याच्या ओळखीच्या गौरव गोस्वामी नावाच्या दिल्ली येथे टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फॉरेन करन्सी एक्सचेंज संदर्भात मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी गोस्वामीशी संपर्क साधला असता त्याने एका मोठ्या व्यक्तीला २५ हजार युएस डॉलरची आवश्यकता असून तो सांताक्रूझमधील हॉटेल ग्रँड हयातमध्ये येणार असल्याचे सांगत कृष्णन नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्यांना पाठवला.

गोस्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार हे २७ फेब्रुवारीला पत्नीसोबत युएस डॉलर्स घेऊन कृष्णन याला भेटण्यासाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये गेले. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये कृष्णन नाव सांगणारा व्यक्ती त्यांना भेटला. त्याने फिल्म लाईन व्यवसायात आल्याचे सांगत हॉटेलच्या लॉबीमध्ये अभिनेता अक्षय कुमार याची शुटींग चालू असल्याने येथे भेटायला बोलावल्याची बतावणी केली. पुढे त्याने तक्रारदार यांना बोलण्यात गुंतवून २५ हजार युएस डॉलर्स घेत तेथून पसार झाला. सगळीकडे शोध घेऊनही कृष्णन न सापडल्याने  तक्रारदार यांनी वाकोला पोलीस ठाणे गाठून फसवणूकीची तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 

गुन्हे शाखेच्या कक्ष आठचे प्रमुख लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. अमेरिकन डॉलर्सच्या बहाण्याने व्यावसायिकांची फसवणूक करणारी एक टोळी यामागे असल्याची माहिती कक्ष आठच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील रहिवासी खान याच्यासह दिल्लीतील रहिवासी शर्मा आणि अग्रवाल यांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. तर, आरोपी कृष्णनचा शोध सुरु आहे. 
 
अशी करायचे फसवणूक
टोळीने मुंबई तसेच देशभरात पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवसायिकांना बोलावून अशाप्रकारे फसवल्याचे समोर आले आहे. यात २५ जानेवारीला आरोपींनी फॉरेक्स ट्रेडींग करणाऱ्या व्यावसायिकाची ३० लाख रूपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याचा संशय असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

Web Title: Fraud of 25 thousand dollars by a foreign currency exchange trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.