विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 06:37 IST2019-04-19T07:21:18+5:302019-04-20T06:37:17+5:30
विक्रोळी पार्कसाईट येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
मुंबई : चेंबरमध्ये अडकलेला ट्रक काढताना बाजूला गप्पा मारत उभ्या असलेल्या मित्रांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून चौघांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना विक्रोळी पार्कसाइट परिसरात घडली. अश्विन हेवारे (३२), विशाल शेलार (२२), अब्दुल हमीद शेख (४२) आणि चंद्रशेखर मुसडे (४०) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत, तर चांद शेख जखमी झाला आहे. पाचही जण विक्रोळीतील सूर्यानगरचे रहिवासी आहेत.
गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास जेवण उरकून पाच मित्र आइस्क्रीम खात, गप्पा मारत उभे होते. त्या वेळी दुकानदारांचे धान्य घेऊन आलेल्या ट्रकचे चाक चेंबरमध्ये फसले. ते बाहेर काढतान ट्रक उलटला आणि हे पाचही जण ट्रक आणि त्यातील गोण्यांखाली चिरडले गेले. स्थानिकांनी ट्रकसह गोण्या बाजूला करत पाचही जणांना बाहेर काढले. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर शेखवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी ट्रकचालकाला तत्काळ अटक केली आहे.
मुंबई - विक्रोळी पार्कसाईटमध्ये भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू #Accident
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2019