Join us  

'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

By मुकेश चव्हाण | Published: September 25, 2020 11:23 AM

देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

मुंबई/ नागपूर: नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून झाली खरी; पण त्याठिकाणी रुजू होण्याआधीच तीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यांना आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा असणार आहे. तुकाराम मुंढेंच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त म्हणून कार्यभार पाहत आहे. मात्र तुकाराम मुंढे यांच्या अचानक आलेल्या बदलीच्या आदेशाने त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला होता. सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंच्या बदलीवरुन राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्रस्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंना नागपूरला पाठविण्यात आले होते, अशी चर्चा रंगली होती. या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्रस्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंना नागपूरला  जर पाठविलेही असेल तर मला काय फरक पडतो? माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कुणीही आले तरी मला त्रस्त करू शकत नाही. पण या सरकारकडून सुडाच्या भावनेने कारवाई केली जाते. यापूर्वी असे झाले नाही. या सरकारला वाटते की, मीडिया असो की, व्यक्ती अथवा राजकीय नेता कोणीही विरोधात बोलू नये, अन्यथा बीएमसीचे लोक त्याच्या घरी जातील. असे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाले नाही. हे सरकार लोकशाहीवादी नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

नागपूरच्या महापौर यांची शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी-

तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपाकडून आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे.

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली-

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत.

टॅग्स :तुकाराम मुंढेदेवेंद्र फडणवीसनागपूरभाजपामहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे