खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 10:39 IST2024-04-16T10:37:28+5:302024-04-16T10:39:07+5:30
लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवसआधी निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे.

खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उमेदवारांनी उघडले का? खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार
मुंबई : लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवसआधी निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागणार आहे. हे खाते उमेदवाराच्या नावानेच उघडावे लागणार असून, त्यानंतर प्रत्येक दिवशी अथवा दर आठवड्याला खर्चाचा तपशील निवडणूक कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. ज्या भागात अजून अर्ज भरण्यास मुदत आहे, तेथील बहुसंख्य उमेदवारांनी अद्याप खाते उघडल्याचे दिसत नाही. मात्र, अर्ज भरण्याचा दिवशी त्यांची लगबग सुरू होईल.
कोणत्या बँकेत खात्याला मुभा?
उमेदवारांना राष्ट्रीय बँकेतच खाते उघडणे बंधनकारक आहे. सहकारी बँक किंवा जिल्हा बँकेत खाते उघडता येणार नाही.
खर्चावर असे ठेवले जाते लक्ष-
१) एका झेंड्यासाठी किती खर्च येतो, सभा, रॅली असेल तर त्यात वापरल्याची जाणारी वाहने, झेंडे, बॅनर, बॅच, स्कार्फ, फ्लेक्स आदींचा तपशील द्यावा लागतो.
२) कार्यकर्त्यांना अल्पोपाहार किंवा जेवण द्यावे लागते. त्यासाठी दरपत्रक ठरवून दिले आहे. मेळावा असेल, त्याबाबत निवडणूक कार्यालयाला कळवले असेल तर निवडणूक कार्यालयाचे पथक तेथे जाऊन सगळा तपशील गोळा करते.
खास माणसाची नियुक्ती-
रोजच्या खर्चाची नोंद ठेवण्यासाठी उमेदवार त्याच्या माणसाची नियुक्ती करतात. रोजच्या खर्चाच्या नोंदी ठेवणे, बिले सांभाळून ठेवणे, बिले आणि अन्य तपशील निवडणूक कार्यालयात सादर करणे, ही जबाबदारी त्याच्यावर असते.
माहिती होते क्रॉस चेक-
खर्चाचा तपशील आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यात तफावत आढळली, तर त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उमेदवाराला दिले जातात. प्रसंगी क्रॉस चेक करण्यासाठी व्हिडीओ शूटिंग तपासले जाणार आहे.