Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:12 IST2025-10-20T09:12:13+5:302025-10-20T09:12:39+5:30
Mumbai Cuffe Parade Fire: कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
Mumbai Cuffe Parade Fire: कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझवली, पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मच्छिमार नगर येथील एका चाळीमध्ये पहाटे ४ वाजता ही दुर्घटना घडली. चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटरी, वीज जोडणी, वायरिंग आणि घरातील वस्तूंपर्यंत ही आग पसरली. १०x१० फुटांच्या जागेत आगीचे हे तांडव सुरू होते.
१५ वर्षांच्या यशचा दुर्दैवी अंत
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करून आगीच्या विळख्यातून चार जणांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने यातील १५ वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये देवेंद्र चौधरी (३०) या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, विराज खोत (१३) आणि संग्राम कुर्णे (२५) या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आग विझवल्यानंतर सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आग नेमकी कशाने लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे आग भडकल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.