Finally, NCP MLA Avdhut Tatkare join to Shiv Sena on Monday | अखेर राष्‍ट्रवादीला धक्का; अवधूत तटकरे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार!
अखेर राष्‍ट्रवादीला धक्का; अवधूत तटकरे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर-धक्के बसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. 

राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्‍हयात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या संध्याकाळी चार वाजता अवधूत तटकरे मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत.

गेल्या महिन्यात अवधूत तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासमवेत अनिल तटकरे सुद्धा उपस्थित होते. तेव्हापासूच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार, हे आता निश्चित झाले आहे. 

काका-पुतण्यांमध्ये वाद? 
सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीवर दावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे समजते. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

सुनील तटकरेंचे निकटवर्तीय रघुवीर देशमुख शिवसेनेत
गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्‍हणाले होते. 

गेल्या निवडणुकीत निसटता विजय
गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत. 

Web Title: Finally, NCP MLA Avdhut Tatkare join to Shiv Sena on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.