बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 16:20 IST2022-05-29T16:19:22+5:302022-05-29T16:20:05+5:30
Brijbhushan singh and Raj thackeray : राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
मुंबई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मोठं वादंग निर्माण झाले. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागणार नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही असा इशारा दिला होता. राज ठाकरेंविरोधात बृजभूषण सिंह यांनी ठिकठिकाणी मेळावे, रॅली काढून मनसेला चिथावणी देणारी विधानं केली होती. राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अयोग्य भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्रजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे मनसे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले की, त्यांनी राज ठाकरेंबद्दल अयोग्य भाषा वापरली होती. ब्रजभूषण यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या दोन समाजात तेढ पसरवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादरमध्ये मनसेच्या वकिलांची आणि अधिकाऱ्यांची टीम जमली होती. वकील गजणे, वकील रवी पष्टे, विभागप्रमुख शंकर नागवेकर यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.