कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:18 AM2019-11-26T03:18:05+5:302019-11-26T03:18:36+5:30

जसजशी थंडीची चाहूल लागते तसतशी मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये फेस्टिव्हल्सची धामधूम बघायला मिळते. यंदाही नोव्हेंबर महिन्यापासून फेस्टिव्हलचे ‘बिगुल’ वाजायला सुरुवात झालीय.

Festival in college | कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम

कॉलेजमध्ये फेस्टिव्हलची धामधूम

Next

- नूपुर गोसावी

जसजशी थंडीची चाहूल लागते तसतशी मुंबईतील प्रत्येक महाविद्यालयामध्ये फेस्टिव्हल्सची धामधूम बघायला मिळते. यंदाही नोव्हेंबर महिन्यापासून फेस्टिव्हलचे ‘बिगुल’ वाजायला सुरुवात झालीय. यात प्रत्येक कॉलेजची थीम ही वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहे. तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे, पोस्टर्स यांमधून नावीन्य जपण्याचा प्रयत्न प्रत्येक कॉलेजेसनी केला आहे. यात विविध स्पर्धांबरोबरच ‘पब्जी’ आणि डिजिटल मार्केटिंगची क्रेझसुद्धा यावर्षी पाहायला मिळते आहे. चला तर मग येताय ना तुम्हीपण या फेस्टिव्हलची धूम अनुभवायला! मग त्याआधी जाणून घ्या काही महाविद्यालयांच्या या वर्षीच्या नवीन संकल्पना...

एच.आर.चा ‘आम्ही जग आहोत!’
यंदा मुंबईतील एच.आर. महाविद्यालयाच्या रोटरी क्लबतर्फे ‘आम्ही जग आहोत!’ या आगळ्या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे १९ वे वर्ष असून ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन येथे हा महोत्सव होणार आहे. दरवर्षीप्रमाणे नृत्य, फॅशन शो, विविध खेळ अशा कार्यक्रमांची रेलचेल यात पाहावयास मिळेल. कमीतकमी वेळात अधिकतम नावीन्य उभारण्यासाठी विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत.

पाटकर वर्देचा 'प्रयोगोत्सव’
यंदाच्या वर्षी गोरेगाव येथील पाटकर वर्दे महाविद्यालयातसुद्धा डिसेंबर महिन्याच्या पूर्वार्धापूर्वीच फेस्टिवलची धामधूम पाहावयास मिळते. महाविद्यालयाच्या बीबीएफ आणि बीबीआय या विभागांमार्फत आयोजित करण्यात येणारा ‘प्रयोगोत्सव’ यंदा पाचव्या वर्षात पदार्पण करतोय. यामुळे देशाच्या अस्मितेला स्पर्श करत भारतीय सेनेवर आधारित ‘शौर्यधारी’ या थीमवर आधारित महोत्सवाची आखणी केली आहे. १७ डिसेंबर रोजी महविद्यालयात आयोजित केलेल्या या महोत्सवात अल्फा ब्यॉटल, डान्स, फिफा, पब्जी, फोटोग्राफी, मंडल आटर््स, फेस पेंटिंग अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

साठ्येचा ‘माध्यम महोत्सव’
साठ्ये महाविद्यालयाच्या पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेला ‘माध्यम महोत्सव’ हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव यंदा ८व्या वर्षात पदार्पण करतोय. दिनांक १८, १९ आणि २० डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे. यात ‘संगीत’ ही थीम घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पत्रकारितेतील मान्यवरांसोबत अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती पाहावयास मिळेल. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह, जोश अधिकच वाढलेला दिसून येतो. यावरूनच यंदा फेस्टिवलचे बिगुल जोरात वाजणार एवढे मात्र नक्की.

एसआयईएसचा ‘दिशा’
यंदा सायन येथील एसआयईएस कॉलेज आॅफ कॉमर्स आणि अर्थशास्त्र या महाविद्यालयातर्फे ‘दिशा’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ याला फाटा देत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त भविष्यकालीन शैक्षणिक संधी आणि परदेशी शिक्षणाचे मार्गदर्शन करणाºया व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि परिसंवादांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. जानेवारी महिन्याच्या पूर्वार्धात होणाºया या महोत्सवात डिजिटल मार्केटिंग, मानसिक आरोग्य, परदेशी शिक्षण अशा बºयाच विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थ्यांमधील परदेशी शिक्षणाची भीती, नोकरी, इंटरनशिप यामधील संभ्रम लक्षात घेत विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाची ओळख करून देण्यात येणार आहे.

‘साठ्ये’ची जाणीव
यंदा विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘जाणीव’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ डिसेंबर रोजी होणारा हा महोत्सव ‘तरुण पिढीच्या बदलाची सुरुवात माझ्यापासून’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. खरेतर, ‘युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती आहे!’ या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक परिस्थितीचे युवकांना विचारमंथन घडवून आणायचे आहे. सामाजिक प्रश्न हाताळण्याचा प्रक्रियेमध्ये तरुणांनी सक्रिय सहभागी होऊन निर्भयपणे आपले विचार अभिव्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी युवकांनी एकत्र येऊन विचारांचे आदानप्रदान करावे तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडावी या हेतूने ‘जाणीव २०१९’ ह्या सामाजिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पथनाट्य, पोस्टर, वकृत्व, घोषवाक्य - पोस्टर आणि समूह नृत्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रासेयोच्या स्वयंसेवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

झेवियर्सचा ‘जश्न हुनर का!’
या वर्षी चर्चगेटमधील नामांकित सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे ‘अंतास’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी हा महोत्सव ‘जश्न हुनर का’ अर्थात उत्सव प्रतिभावंतांचा या थीमवर आधारित आहे. २७ आणि २८ डिसेंबर या दोन दिवसीय कार्यक्रमात हिंदी विभागातर्फे या वार्षिक सांस्कृतिक उत्त्सवात नाट्य, संगीत, कविता इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आपली राष्ट्रभाषा हिंदी जपणे तसेच संस्कृती व एकात्मतेचा संदेश देत सध्याच्या पिढीला हिंदी नाट्य व साहित्याची ओळख करून देणे हा आहे. यात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

Web Title: Festival in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.