Join us

मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी लहान मुलीसह पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 12:17 IST

सदर शेतकरी आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते.

मुंबई - शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्यांच्या एका लहान मुलीला पोलिसांनी मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतले आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  सदर शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. तसेच त्यांनी आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेरीस आज ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले.  त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. यावेळी या शेतकऱ्यासह छोट्या मुलीला धक्काबुक्की झाली. 

त्यानंतर सदर शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे.  दरम्यान, मातोश्रीवर भेटण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी असे वागावे लागते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :शेतकरीमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेमहाराष्ट्र