मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 15:44 IST2021-08-23T15:42:51+5:302021-08-23T15:44:54+5:30
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली.

मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा
मुंबई - 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला, त्यांचे पुत्र गणेश जाधव यांनी ही दु:खी बातमी दिली. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, गरिबांकडे पाहायला सरकारला वेळ नाही, असेही त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी होते. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी गार्डन गेटजवळ येऊन त्यांनी छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे राज्य सरकार लक्ष देत नाही.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2021
मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे! pic.twitter.com/GcURctw982
शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सरकारकडे कुठलिही व्यवस्था उरलेली नाही. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत आहेत की, त्यांना गरिबाकडे पहायला फुरसत नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहेत. शेतकऱ्याचा प्रश्न त्याच्या मृत्युनंतर तरी सोडवला पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, सरकारमधील तिन्ही पक्षांवर टीका करताना, गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे सत्तेला चिकटलेले हे तीन पक्ष, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून जाधव यांनी आपली व्यथा मांडली होती. त्यामध्ये आपल्यासोबत कशाप्रकारे अन्याय झाला, याची व्यथा मांडली होती. आरोपींनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करुन, अर्धनग्न करुन जमीन बळकावली, असा आरोप त्यांनी केला होता. सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते.
न्याय मिळावा यासाठी मंत्रालय गाठले
आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले. तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशके पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे यावरून विरोधक धारेवर धरतील अशी चर्चा आहे.