भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:02 AM2019-10-31T01:02:59+5:302019-10-31T01:03:18+5:30

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कुठलाही प्रश्न सहज सोडविण्याची क्षमता असलेले व राज्याला स्थिर सरकार देणारे नेते असा फडणवीस यांचा उल्लेख करून, त्यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला.

Fadnavis is elected as BJP's legislative leader and Shiv Sena has a strong voice over the Chief Minister. | भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर

भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीसांची निवड तर मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा नरमाईचा सूर

Next

मुंबई : पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर देवेंद्र फडणवीस दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत ताणून धरले असताना भाजपने फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून, मुख्यमंत्री आमचाच असे स्पष्ट केले. लगोलग मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा सूरही नरम झाला. त्यामुळे राज्यात ‘पुन्हा एकदा देवेंद्र’चा मार्ग प्रशस्त झाला आहे.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारचा शपथविधी ३ वा ५ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ‘छत्रपती शिवरायांचा सेवक म्हणून पाच वर्षे राज्याची सेवा केली आणि त्याच सेवाभावनेतून पुढील पाच वर्षे रयतेचे राज्य आपण चालवू व स्थिर सरकार देऊ’, अशी ग्वाही फडणवीस यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर दिली. भाजप आमदारांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात व जोरदार बाके वाजवून फडणवीस यांच्या नेता निवडीचे जबरदस्त स्वागत केले. ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. महायुतीचेच सरकार येणार याबाबत शंका बाळगू नका.’ असा विश्वास फडणवीस यांनी दिला. महायुतीच्या यशाचे श्रेय त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दिले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कुठलाही प्रश्न सहज सोडविण्याची क्षमता असलेले व राज्याला स्थिर सरकार देणारे नेते असा फडणवीस यांचा उल्लेख करून, त्यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. फडणवीस यांनी पाच वर्षे सक्षमपणे कारभार सांभाळला. त्यामुळे त्यांच्याशिवाय अन्य नाव पुढे येऊ शकत नाही, असे ते म्हणाले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह ११ सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, प्रभारी सरोज पांडे, भाजपचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.

संजय राऊत यांची भाषा बदलली
अडीच-अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना अडून बसल्याचे चित्र गेले काही दिवस असताना आज मात्र पक्षाचे खा.संजय राऊत यांनी, युतीमध्ये राहण्यातच शिवसेना, भाजप व राज्याचेही भले आहे, असे सांगून, उद्धव ठाकरे जे आदेश देतील ते आम्ही सर्व करू, असे स्पष्ट केले. सगळे ठरल्याप्रमाणे झाले, तरच राज्यात स्थिर सरकार येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले. युती तोडण्याच्या वा अन्य पर्याय शोधण्याच्या भाषेला शिवसेनेने पूर्णविराम दिल्याचे दिसले.

Web Title: Fadnavis is elected as BJP's legislative leader and Shiv Sena has a strong voice over the Chief Minister.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.