Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांच्यातला प्रत्येक जण पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघतोय'; १७ पक्षांच्या बैठकीवर CM शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 14:21 IST

विरोधकांच्या या बैठकीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी पाटण्यातील बैठकीत घेतला. तथापि, नियोजनाबबत पुढील महिन्यात शिमला येथे आगामी नियोजनाबाबत सल्लामसलत करण्याचेही यावेळी ठरले. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल,  हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह १७ पक्षांचे जवळपास ३२ प्रतिनिधी हजर होते.

विरोधकांच्या या बैठकीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १७ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला. 

दरम्यान, बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला. 

आमची भूमिका योग्य होती-

मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेनरेंद्र मोदीकाँग्रेसभाजपा