पाकिस्तान अन् बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा; उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपाला आव्हान
By मुकेश चव्हाण | Updated: February 16, 2021 18:32 IST2021-02-16T18:18:04+5:302021-02-16T18:32:34+5:30
आज मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली.

पाकिस्तान अन् बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा; उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपाला आव्हान
मुंबई: त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बिप्लब कुमार देब (Tripura CM Biplab Deb) कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी देब यांनी भाजपानं केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे, अशी माहिती दिली होती. यासोबतच नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचं सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे, असं देब यांनी भाजपाच्या एका कार्यक्रमात विधान केलं होतं.
बिप्लब कुमार देब यांच्या या विधानावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणतात. हिम्मत असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करुन दाखवा. मग आम्ही तुमचं स्वागत करु, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. आज मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
राम मंदिर निर्माणासाठी देशभरात भाजपाकडून निधी संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. पण आता भाजपा पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपाकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर बोलावलेली शिवसेना नेत्यांची बैठक संपली; वनमंत्री संजय राठोड बैठकीला गैरहजर #PoojaChavanSuicidehttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
... नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती- उद्धव ठाकरे
दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपामध्ये गेले. नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात शिवसेना शिवसंपर्क अभियान करणार-
शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.