विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर रवींद्र धंगेकर यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला. काँग्रेस अलविदा करत, रवींद्र धंगेकरांनी सोमवारी (१० मार्च) उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. रवींद्र धंगेकर यांच्या काम करण्याच्या कार्यशैलीचं कौतुक करताना शिंदे म्हणाले की, "आता लोकांना कळेक हू इज धंगेकर (धंगेकर कोण आहे?)"
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्यासोबतच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील मुक्तागिरी बंगल्याच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसचे म्हणणार नाही कारण...
"आपले पुणेकर, रवींद्र धंगेकर! काँग्रेसचे मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते. त्यांनी धनुष्यबाण उचलला आहे. त्यांनी कामांनी ओळख निर्माण केली आहे. मी पोटनिवडणुकीत तिकडे होतो. पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी... तेव्हा ऐकलं मी की कार्यकर्ता म्हणून कसं काम करायचं ते", असे शिंदे धंगेकरांचं कौतुक करताना म्हणाले.
पोटनिवडणुकीत धंगेकरने बाजी मारली
"रवींद्र धंगेकर त्या भागात नगरसेवक होते, २५ वर्षे. त्यापैकी १० वर्षे शिवसेनेचे नगरसेवक होते. सर्व सामान्य माणसाला मदत कशी करायची, असा कार्यकर्ता. ती पोटनिवडणूक गाजली. एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली", असे शिंदे रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशावेळी म्हणाले.
"आता तुम्ही शिवसेनेत आलेला आहात. आता लोकांना कळेल 'हू इज धंगेकर'. बरोबर ना? थोडं कसं तो दुसऱ्या पक्षाचा होता, काँग्रेस. ते जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे", असे शिंदे यांनी म्हणताच सगळे खळखळून हसले.
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
"त्यांनी आम्हाला त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. एक मोठे भाऊ म्हणून पक्षात सामावून घेतलं. असंच प्रेम त्यांनी आमच्यावर आणि पुणेकरांवर करावं. यापुढे आपण जो आदेश द्याल तो सन्मानाने पाळू. शिवसेनेचे नाव कमी होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही सगळे काम करू", असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
"शिंदे साहेबही आक्रमक आहेत. जिथे चुकीचे असेल, तिथे सत्ता ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील. जिथे चूक तिथे चूक म्हणण्याचे काम आहे. शिंदे साहेबांकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले, पण आम्ही मनापासून शिवसेनेत पोहोचलो", अशी भूमिका धंगेकरांनी मांडली.