एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:36 IST2025-12-30T17:20:36+5:302025-12-30T17:36:40+5:30
Lalbagh-Dadar BMC Election 2026: दादर माहिम मतदारसंघातील वार्ड क्रमांक १९२ यावरून उद्धवसेना-मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यात हा वार्ड मनसेला सुटला.

एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नाराजी उफाळून आली. त्यात मुंबईतील राजकीय लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईत ठाकरे बंधू यांच्या युतीला आव्हान देण्यासाठी भाजपा आणि शिंदेसेना महायुतीत निवडणूक लढत आहे. त्यात दादर लालबागसारख्या भागात ठाकरेंचे मोहरे हेरून एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी ठाकरेंकडील नाराज इच्छुकांना पक्षात प्रवेश घेत तिकीट दिले आहे.
दादर माहिम मतदारसंघातील वार्ड क्रमांक १९२ यावरून उद्धवसेना-मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यात हा वार्ड मनसेला सुटला. त्याठिकाणी राज ठाकरे यांनी पक्षाचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी दिली. मात्र या वार्डातील उद्धवसेनेचे नगरसेवक प्रीती पाटणकर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे नाराज उद्धवसेनेचे पदाधिकारी प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांना शिंदेसेनेने वार्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी घोषित केली आहे. त्याशिवाय लालबाग शिवडी येथेही उद्धवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे अनिल कोकीळ यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
वार्ड क्रमांक २०४ या मतदारसंघातून अनिल कोकीळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. याठिकाणी मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शाखाप्रमुख किरण तावडे यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोकिळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे या भागातील ही लढत चुरशीची होणार आहे. लालबाग परळ शिवडी हा भाग मराठी बहुल आहे. त्याठिकाणी ठाकरेंकडून दिलेला उमेदवार हा कायम निवडून येतो असा इतिहास आहे. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात बंडखोरी करून शिंदेसेनेतून उभे राहिलेले अनिल कोकीळ या ठिकाणी कडवी झुंज देणार आहेत.
दुसरीकडे माजी महापौर श्रद्धा जाधव यांना वार्ड क्रमांक २०२ मधून उमेदवारी दिली आहे. याठिकाणी स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर हे अपक्ष अर्ज भरणार आहेत. जाधव यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केला. एकाच व्यक्तीला एकाच कुटुंबाला किती वर्ष पक्षाकडून तिकीट दिले जाते. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.