Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 21:49 IST2022-10-05T21:47:55+5:302022-10-05T21:49:52+5:30
CM एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, गांधी कुटुंबावरही सोडलं टीकास्त्र

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"
Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या कष्टातून उभी राहिली आहे. तुम्ही शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, म्हणून माझी शिवसेना आहे. पण हे बोलतात की लाखो गेले, आमदार गेले, खासदार गेले, तरी मी माझ्या पक्षाचा आहे म्हणतात. आता तरी डोळे उघडा. काँग्रेसवाल्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, त्या पक्षाची आज अवस्था वाईट आहे. त्यांच्याकडे पक्ष आहे पण अध्यक्ष नाही, आणि इथे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंसह काँग्रेसची खिल्ली उडवली. ते मुंबईत बीकेसी येथे मैदानात आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होते.
तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?
"बाप चोरला बाप चोरला असं तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? आम्हाला शिवतीर्थवर परवानगी मिळाली नाही तरी आजच्या गर्दीनं खरी शिवसेना कुठं आहे सिद्ध झालं आहे. या विराट सभेला उपस्थित राहणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक मी झालो. कारण आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आला आहात. काल रात्रीपासूनच तुम्ही इथं आलात. कारण बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीका केली.
सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती!
"सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. मी आज सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंची देखील नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि वारसा विचारांचा असतो. सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं. बाळासाहेबांचे वारसदार हे विचारांचे वारसदार. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो", असेही एकनाथ शिंदे यांनी ठणकावले.