शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:34 IST2025-02-22T10:33:18+5:302025-02-22T10:34:19+5:30

राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Eknath Shinde Shiv Sena minister Uday Samant meets Raj Thackeray at Shivtirth residence; What is the reason for the meeting? | शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय?

शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय?

मुंबई - विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसे आणि शिंदेसेनेत तणाव असल्याचं दिसून आलं होते. निवडणुकीपूर्वी चर्चा न करता मनसेने उमेदवार जाहीर केले त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. या निवडणुकीत मनसेचं नुकसान झाले त्याशिवाय शिंदेसेनेलाही फटका बसला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते. आज शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती मी राज ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्याबद्दल आज त्यांचे आभार मानण्यासाठी मी भेट घेतली. मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला राजकीय स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती. आमची राजकीय भेट नव्हती असं त्यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. विश्व मराठी संमेलनाला राज ठाकरे उपस्थित होते, त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित युतीमध्ये येणार का हे माझ्यासाठी फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरील चर्चेत मी कधी पडलो नाही. माझ्या आवाक्यातील आणि झेपतील असे प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देऊ शकतो असा चिमटा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना काढला.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आजची चर्चा राजकारणविरहित होती. राज ठाकरेंच्या भाषणाची शैली आणि त्यांचे वकृत्व वेगळे आहे. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर भविष्यात आपल्यातही सुधारणा होऊ शकते त्यादृष्टीने भेटीकडे पाहावे. मराठी उद्योजकांवर, मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन त्यांनी केले. मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी, कलाकारांसाठी काय केले पाहिजे यावर चर्चा झाली. गप्पांच्या माध्यमातून चर्चा झाली असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

Web Title: Eknath Shinde Shiv Sena minister Uday Samant meets Raj Thackeray at Shivtirth residence; What is the reason for the meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.