"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:17 IST2025-08-22T16:12:50+5:302025-08-22T16:17:50+5:30
निवडणुकीपूर्वी हिंदी मराठी वाद उभा करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बेस्टच्या मराठी कामगारांनी त्याला पूर्णपणे नाकारले असंही संजय निरूपम यांनी म्हटलं.

"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
मुंबई - ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीच फरक पडत नाही, कारण ते दोघे बोलबच्चन आहेत. मराठी समाजासाठी काम करण्यासाठी ते झीरो आहेत अशा खोचक शब्दात शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बेस्ट पतपेढी निकालाचा उल्लेख करत संजय निरूपम यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. निरूपम म्हणाले की, मराठी माणसांना आज जी अपेक्षा आहे, त्यांचा विश्वास फक्त आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंचा जर ब्रँड असेल तर तो फक्त एकनाथ शिंदे आहेत. ठाकरे बंधू दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराविरोधात काम करतात. उबाठाला सध्या जर कुणी सांभाळत असेल तर ते मुस्लीम मतदार आहेत. जर ते बाजूला झाले तर उबाठाला एकही जागा मिळणार नाही असा टोला त्यांनी लगावला.
तसेच बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ज्याप्रकारे ठाकरे ब्रँड पुढे केला आणि त्यानंतर जे निकाल आले, त्यात पहिल्याच प्रयोगात ते फेल झालेत. बेस्टची निवडणूक यासाठी महत्त्वाची होती, कारण या निवडणुकीत एकीकडे मनसे आणि उबाठा होते, दुसऱ्या बाजूला भाजपा-शिवसेना होती. ही निवडणूक छोटी असली तरीही मुंबईसाठी महत्त्वाची होती. या निवडणुकीत जवळपास १५ हजार मतदार होते, त्यातील साडे बारा हजार मतदारांनी मतदान केले. ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. हे सर्व मतदार मराठी होते, भूमिपुत्र होते परंतु मनसे-उबाठा युतीला त्यांनी नाकारले. निवडणुकीपूर्वी हिंदी मराठी वाद उभा करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बेस्टच्या मराठी कामगारांनी त्याला पूर्णपणे नाकारले असंही संजय निरूपम यांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबईत एकच ब्रॅंड तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत. मुंबईतील मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्थान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत. मुंबई सर्वांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरात भाषिक वाद करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे नाकारले जाईल असं बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून संदेश मिळाला आहे. मुंबईत उबाठाचे आमदार आणि खासदार हे मुस्लिम मतांवर निवडून आले. त्यांच्यापासून मराठी मतदार दुरावला आहे असंही संजय निरूपम यांनी म्हटलं.