मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 08:43 IST2025-08-16T08:40:40+5:302025-08-16T08:43:41+5:30
Vikhroli Landslide Mumbai Rain Updates: मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Mumbai Rain Updates: शुक्रवार रात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाने काही भागांत रेड अलर्ट, तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी दिवसभर पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यातच विक्रोळी भागात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. विक्रोळीतील पार्कसाईट या परिसरात ही दरड कोसळली. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली. यामध्ये या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबीयांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बापलेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये
भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाण्यासाठी १६ आणि १७ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते, असा इशारा विभागाने दिला आहे. तसेच मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला, विद्याविहार या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतात. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दादर परिसरातही रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.