१५ जूनपासून शाळा नकोच... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:57 PM2020-05-28T18:57:22+5:302020-05-28T18:58:05+5:30

अद्याप ऑनलाईन शिक्षणाबद्दल काहीच निर्देश नसल्याने ऑनलाईनचा अट्टहास न करण्याची मागणी

Don't miss school from June 15 ...! | १५ जूनपासून शाळा नकोच... !

१५ जूनपासून शाळा नकोच... !

Next


मुंबई : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता १५ जूनपासून शाळा सुरू करणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये अशी ठाम भूमिका पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्त करीत आहेत. शिक्षण विकास मंच या शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांच्या फेसबुक समूहावर सदस्य व शिक्षक असलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी शाळा सुरु करण्याबाबत घेतलेल्या मतदान सर्वेक्षणात राज्यातील सदस्यांपैकी ३५० हून अधिक सदस्यांनी शाळा १५ जून पासून सुरु करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर ७७ सदस्यांनी शाळा सुरु करणे योग्य असल्याचे म्हटले आहे. काहीजण शिक्षण विभागाच्या या निर्णयाबद्दल साशंक असून काहींनी वयोगटानुसार व ईयत्तानुसार शाळा सुरु करण्याचा विचार व्हायला हवा असे मत नोंदवले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीचा विचार करून ७० टक्क्यांहून अधिक पालक शिक्षकांना शिक्षण विभागाने शाळा सुरु करणे हितावह नसल्याची माहिती आपल्या सर्वेक्षणातून त्यांनी दिली.

१५ जूनपासून शाळा सुरु होणार का? कुठे सुरु होणार ? ऑनलाईन अभ्यास आणि तासिका कशा असतील या सगळ्याच गोष्टींबद्दल अद्याप गोंधळ आहे. जरी मे महिना संपत आला असला तरी जूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही लाखांत असेल असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यात कोरोना ग्रामीण भागात पोहोचला असून अनेक कामगार पालकांनी स्थलांतर केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये शासनाने क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतले आहेत. त्या कधी रिकाम्या होणार हे देखील माहिती नाही  तर त्यांचे निर्जंतुकीकरण कधी करणार असे प्रश्न पालक आणि शिक्षक उपस्थित करत आहेत. शिवाय शिक्षकांना मे महिन्याच्या सुट्टीत ही कोरोनाचे काम करावे लागले आहे. आताही ऑनलाईन शाळा सुरु करून शिक्षकावर कामाचे ओझे लादले जात असल्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली.

एकीकडे आर्थिक अडचणीत सापडलेला असताना इ लर्निंगसाठी आवश्यक स्मार्टफोन , लॅपटॉप यांचा खर्च पालकांना बुचकळ्यात टाकणारा असल्याचे मत पंड्या यांनी नोंदविले आहे. अद्याप अभ्यासक्रम कसा असणार आहे ? दिवसाचे किती तास ऑनलाईन अभ्यास घ्यायचा याबद्दल काहीच निर्देश नाहीत.  विशेष म्हणजे  विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शाळा सुरु करण्याची घाई नको असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. काही पालकांनी आम्हाला आमची मुले महत्त्वाची आहेत, आम्ही मुलांना घरी बसवून शिकवू पण इतक्यात शाळांमध्ये पाठवणार नसल्याची भूमिका घेतल्याचे ही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Don't miss school from June 15 ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.