Join us

ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:24 IST

Chitra Wagh On Shiv Sena UBT Lok Sabha Election Campaign : शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता एका जाहिरातीवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. 

चित्रा वाघ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषेदत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला. "आदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे, त्याचे 'उल्लू' ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली?" असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ते कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून तुम्ही 'बाप' असल्याचs महाराष्ट्राला दाखवणार आहात का ? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. तसेच, या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का? असाही सवाल चित्रा वाघ यांनी केला. 

याचबरोबर, ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ही कंपनी कोणाची, त्याचा आणि या पॉर्न स्टारचा काय संबंध आहे ? या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे. तसेच, यासंबंधीचा तपास व्हायला पाहिजे असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या जाहिराती तयार केल्या आहेत. एका जाहिरातीमध्ये सरकारला महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील कलाकारावर आक्षेप घेत भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :चित्रा वाघउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४शिवसेनाभाजपा