"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:11 IST2025-10-03T11:08:39+5:302025-10-03T11:11:56+5:30
Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाजपने बाण डागले. टोमणा मेळावा असे म्हणत भाजपने ठाकरेंना डिवचले.

"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
Maharashtra Politics: "विचारांचं सोनं लुटायला बोलवायचं आणि हातावर कथलाचा कटोरा ठेवून टोमण्यांच्या तालावर आपल्या नसत्या कर्तबगारीचे गोडवे बेसूर सुरात गायचे, हा एवढा अट्टाहास कशासाठी?", असा सवाल करत भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंच्या मेळाव्याला टोमणा मेळावा असे संबोधत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एक सल्लाही दिला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात पार पडला. या मेळाव्यात ठाकरेंनी केलेल्या भाषणाला टोमणा मेळावा म्हणत केशव उपाध्ये यांनी टीकेचे बाण डागले.
भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले, "अगतिकता हा अट्टहास, दुराग्रह व अहंकार यांच्या संगमातून उगम पावणारा प्रकार काल उद्धव ठाकरेंच्या टोमणा मेळाव्यातील केविलवाण्या गर्दीतून महाराष्ट्राने अनुभवला."
पदरी अगतिकता पडली
"रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोची काल आठवण झाली. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय. शेतकऱ्यांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र त्याची चिंता सोडून केवळ अट्टाहासाने घेतलेल्या या मेळाव्यातून पदरी पडली ती फक्त अगतिकता", असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला.
...तर झाकली मूठ झाकलीच राहिली असती
"जिथे बाळासाहेबांच्या विक्रमी गर्दीच्या सभा व्हायच्या तिथे ओकंबोकं मैदान आणि रिकाम्या खुर्च्या! अतिवृष्टीच्या आतंकात होरपळून निघालेल्या संकटग्रस्तांना मदत करण्याऐवजी पाण्यासारखा पैसा ओतून जुनी रडगाणी गाऊन दाखविण्याचा बेसूर दुराग्रह कसा अंगाशी येतो, ते स्वतःलाच समजल्यावर आता तरी पश्चात्तापातून प्रायश्चित्त घेण्याची सबुद्धी यांना सुचली असती, तर परिपक्वता दिसली असतीच आणि झाकली मूठ झाकलीच राहिली असती", असे भाजपचे नेते उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
रडगाणे सामनातून वाजवले असते, तर...
"एवढ्याशा कारणासाठी कोट्यावधींचा चुराडा करण्याऐवजी तेच रडगाणे सामनातून वाजवले असते, तर रिकामे रकाने तरी भरून गेले असते. तसेही आज तेच करावे लागले ना? या अहंकारातूनच मुंबई कधीच हातातून गेली. २०१४ नंतर मुंबईकरांनी विकासाला मतदान केलं, या वास्तवाचे भान नाही. तीच जुनी पालुपदं, तीच अहंकारी भाषा; आता ना आता मुंबईकरांना भावते, ना नवमतदारांना आकर्षित करते", अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला.
"ओढून ताणून केलेल्या सभेत ती अगतिकता दिसत होती. ना द्यायला काही विचार होता ना मैदानात गर्दी होती. रिकाम्या खुर्च्या आणि विचार देण्याचा अभाव यातून फक्त दिसत होती ती निराशा... तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत ना पार…", असा टोला केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना लगावला.