Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंच्या PRO चं व्हॉट्सअ‍ॅप बंद, आणीबाणी लागू केल्याचा सरकारवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 10:57 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.

मुंबई - विधान परिषद विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअ‍ॅप अचानक बंद झाले आहे. विशेष म्हणजे, 'आपला फोन नंबर व्हॉट्सअ‍ॅपसाठी बॅन करण्यात आल्याचा मेसेज' व्हॉट्सअ‍ॅपकडून त्यांना येत आहे. प्रशांत जोशी हे गेल्या 13 वर्षांपासून मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सध्या ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' या यात्रेचं मीडिया मॅनेजमेंट करत आहेत.  

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. या संभांमधून ते राज्य सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मुंडेंच्या या सभांचे वार्तांकन सोशल मीडियातून तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी करतात. परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या सभांचे वार्तांकन काही मिनिटांतच लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात. तसेच राज्यातील माध्यमांना संपर्क करण्याचं कामही तेच करतात. मात्र, अचानक त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर बॅन करण्यात आला आहे. 

प्रशांत जोशी यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर बॅन केल्याचा दावा स्वत: धनंजय मुंडे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. दरम्यान, सध्या प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद असून त्यांनी संपर्कासाठी दुसरा क्रमांक घेतला आहे. तसेच, त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपशीही यासंदर्भात संपर्क केला असून तोच नंबर पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसव्हॉटसअ‍ॅप