Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार?; जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Updated: January 14, 2021 09:24 IST

धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली.

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

एकीकडे विरोधक जरी आक्रमक झाले असताना धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. तसेच  धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. 

जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 

तत्पूर्वी, धनंजय मुंडे  यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. 

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे- धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत)  स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही  तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे. 

निवडणूक आयोगाकडे तक्रार 

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून त्यात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात अपत्यांची माहिती लपवली, दुसऱ्या विवाहाची माहितीदेखील लपवली. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

करणी सेनेचे समर्थन 

‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडेंच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाही. मुस्लिम ४-४ लग्न करतात, तर एखाद्या हिंदूने दुसरं लग्न केलं म्हणून काय फरक पडतो’, असे म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे पदाधिकारी अजय सिंह सेंगर यांनी धनंजय मुंडे यांचे जोरदार समर्थन केले आहे. 

टॅग्स :धनंजय मुंडेजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडी